बैलांना अंघोळीसाठी नेणार्या जामनेरच्या तरुण शेतकर्याचा बुडून मृत्यू

Young farmer from Jamner drowns while taking bulls for bathing जळगाव (22 ऑगस्ट 2025) : बैलांना नदीवर अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या देवळसगाव (ता.जामनेर) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सुशील सुनील इंगळे (22) असे मृताचे नाव आहे. ऐन पोळ्याच्या दिवशीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
शुक्रवारी पोळा सण असल्याने सुशील आपल्या बैलांना अंघोळ घालण्यासाठी सूर नदीकाठी गेल्यानंतर यावेळी पावसामुळे नदीला मोठा पूर आल्याने त्याचवेळी सुशील बैलांना अंघोळ घालत असताना नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. काही कळण्याआत पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला.
ही घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला. या घटनेमुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बैलपोळा सणाच्या उत्साहावर पाणी फिरविणार्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले.