शाळकरी विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा अत्याचार : पाचोरा तालुक्यात खळबळ

School bus driver’s torture of schoolgirl : Uproar in Pachora taluka पाचोरा (23 ऑगस्ट 2025) : पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनावर स्कूल बस चालकाने शेतात अत्याचार केला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. अबीद हुसेन शेख जलील (38, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. आरोपीला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
काय घडले पिडीतेसोबत
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णी (ता.जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात स्कूल बसचालक अबिद हुसेन शेख जलील (38, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना संशयिताने ‘तू मला आवडतेस’ म्हणून पाठलाग करीत तिचा विनयभंग केला.
शेतात घेऊन जात केला अत्याचार
घडलेला प्रकार पीडितेने घरी सांगितल्यानंतर याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. पीडित मुलीने गुरुवारी पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे की, बसचालकाने माळेगाव (ता.जामनेर) येथील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच या मुलीला फोनवरून वारंवार धमकावत व अश्लील बोलत छळ केला.
बसने 50-60 विद्यार्थ्यांचा प्रवास
संबंधित गावातून दररोज 50 ते 60 विद्यार्थी – विद्यार्थिनी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. बसचालकाने या आधी देखील कुणाची छेड काढली आहे का? याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.