आरक्षण न दिल्यास सरकार उलथवणार ! : मनोज जरांगेंचा इशारा

If reservation is not given, the government will be overthrown!: Manoj Jarange warns जालना (25 ऑगस् 2025) : आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिला.
जरांगे यांनी यावेळी येत्या 27 तारखेला सकाळी 10 वाजता मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली. मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघतील. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईतील आझाद मैदानात पोहोचतील, असे त्यांनी आज स्पष्ट केले.
असे असेल दौरा
बुधवारी सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार असून त्यानंतर महाकाळा, शहागड, शहागड चौक, वडीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, आंबेटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवळी, आपेगाव माउलींचे, वाघाडी, पैठण, उंचेगाव, पाटेगाव, तळणी, शेवगाव, वडुली, मळेगाव, मिरी नाका, पांढरी पूल, अहिल्यानगरच्या बायपासमार्ग कल्याण फाट्यावर जाणार. तेथून पुढे आळेगाव, नारायण गाव आणि 27 ऑगस्ट रोजी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहोचणार आहेत.
28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जाऊ. तेथून तळेगाव, लोणावळा, पणवेल, वाशी, चेंबूर मार्गे 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण आझाद मैदानाला पोहोचणार. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी सकाळपासून आपले आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल, असे जरांगे यांनी सांगितले.
10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकते
सरकारकडून देण्यात आलेले 10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकते. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याने घर देऊ नका, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयर्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे.
फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
कायद्यात बसणारे आरक्षण आम्हाला हवे आहे. न बसणार्या 29 जाती फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणात घालून त्यांनी खुन्नस दाखवली आहे. सरकारकडूनच नेमण्यात आलेल्या शिंदे समितीकडून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. समिती सुद्धा तुमचीच होती. समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारण्यात आला, तर मग आडमुठे कोण? असा सवालही मनोज जरांगेंनी केला. कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावे. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. आमची ही आमची जमीन आहे हे आम्हाला भक्कम माहीत आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.
आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन
देवेंद्र फडणवीस खुन्नस दाखवत आहेत. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो. आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही. पण अंतरवली सोडल्यावर मी कोणत्याच मंत्र्यांचे ऐकणार नाही, असे मनोज जरांगे म्हणालेत.