गणेश भक्तांना दिलासा : सीएसएमटी-मुंबई ते नागपूरदरम्यान दोन विशेष गाड्या धावणार

भुसावळ (26 ऑगस्ट 2025) : श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेकडून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई आणि नागपूर दरम्यान दोन अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
गाडी क्रमांक 01101 विशेष 26 ऑगस्ट रोजी पहाटे 12.30 वाजता सीएसएमटी मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.40 वाजता नागपूरला पोहोचेल तर गाडी क्रमांक 01102 विशेष त्याच दिवशी संध्याकाळी 5.20 वाजता नागपूर येथून सुटून दुसर्या दिवशी सकाळी 8.25 वाजता सीएसएमटी मुंबईला दाखल होईल.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे असतील. गाड्यांची रचना एक वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह असेल.
अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येणार असून सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या सामान्य दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे.