रत्नागिरी हादरले : आईची गळा चिरून हत्या करीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Ratnagiri shaken : Young man attempts suicide by slitting mother’s throat रत्नागिरी (26 ऑगस्ट 2025) : रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या आईचाच मुलाने गळा चिरून खून केला व नंतर स्वतःदेखील नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. अनिकेत शशिकांत तेली (25) असे हत्या करणार्या तरुणाचे तर पूजा शशिकांत तेली असे खून झालेल्या मातेचे नाव आहे.
काय घडले रत्नागिरीत ?
रत्नागिरी शहराजवळ असणार्या नाचणे गावातील सुपल वाडी येथे पूजा तेली आणि त्यांचा मुलगा अनिकेत राहत होते. मंगळवारी सकाळी अनिकेतने अज्ञात कारणातून आईच्या गळ्यावर वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली.
नस कापल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला अनिकेत घराबाहेर येऊन बसला, तेव्हा शेजार्यांनी ही घटना पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. अनिकेतच्या शेजारीच त्याचे काका राहतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि पंचनामा सुरू केला. पूजा तेली यांचे शव घरातच असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.
कर्जामुळे आईची हत्या?
प्राथमिक माहितीनुसार, अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा एकटेच राहत होते. परिसरातील लोकांमध्ये चर्चा आहे की, शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या कर्जामुळे ही घटना घडली असावी. मात्र, याबद्दल पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.