चाळीसगाव हादरले : भाजपाचे माजी नगरसेवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Chalisgaon shaken : Former BJP corporator fatally attacked by a coyata चाळीसगाव (27 ऑगस्ट 2025) : गुन्हा दाखल झाला असल्याच्या रागातून संशयीतांनी चाळीसगावातील भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी (चौधरी वाडा, चाळीसगाव) यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केली. ही घटना मंगळवार, 26 रोजी रात्री 11 वाजता वैष्णवी साडी सेंटर, रेल्वे स्टेशन रोडवर घडली. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय घडले चाळीसगावात ?
चेतन प्रभाकर चौधरी (18, चौधरी वाडा, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत सोमा उर्फ सागर दगडु चौधरी व ईतर तिघांनी सोमा चौधरीविरोधात दाखल झालेला गुन्हा हा वडिल प्रभाकर चौधरी यांच्या सांगण्यावरूनच दाखल झाल्याच्या संशयातून त्यांच्या स्कुटीला चारचाकीने धडक देवून खाली पाडले व त्यांच्यावर स्टेशन रोड परिसरात कोयत्याने हल्ला चढवला.
पोलिस अधिकार्यांची धाव
हल्ल्यानंतर पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी कार्यालयाचे उद्घाटन
प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्याहस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले व त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावमधील वैष्णवी साडी सेंटरजवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना एकटं गाठून डाव साधला. अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून चौधरी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळ्याच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरे काही कारण होतं, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.