विरारमध्ये इमारत कोसळली : 15 हून अधिक जणांचा मृत्यू

Building collapses in Virar: More than 15 people dead विरार, मुंंबई (28 ऑगस्ट 2025) : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये बुधवारी रात्री एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीतील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. विरार परिसरातील विजय नगरमध्ये बुधवारी रात्री 12.05 वाजता सुमारे 50 फ्लॅट असलेले चार मजली रमाबाई अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका रिकाम्या घरावर कोसळले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असताना इमारतीच्या एका भागात 12 फ्लॅट कोसळले, ज्यामुळे रहिवासी आणि पाहुणे ढिगार्याखाली गाडले गेले. या अपघातात मुलगी आणि तिच्या आईचाही मृत्यू झाला.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून इमारतीच्या मातीचा ढिगारा शेजारच्या चाळीवरही कोसळल्याने रहिवासी मलब्याखाली दबले गेले. या घटनेत सुमारे 15 नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 24 जणांना इमारतीच्या ढिगार्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
30 तासांपासून बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेची तुकडी आणि स्थानिक पोलिस रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत.
विरारच्या विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगार्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या अपार्टमेंटमध्ये 50 घरं आहेत. त्यापैकी 12 घरं कोसळली. तसेच इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली आणि मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दल व एनडीआरएफ घटनास्थळी तत्काळ दाखल झालं होतं.