कौटूंबिक वाद विकोपाला : भावपूर्ण श्रद्धांजलींचे स्टेटस ठेवत पत्नीला निर्घृणपणे संपवले

Family dispute leads to death : Wife brutally murdered while posting emotional tribute status परभणी (28 ऑगस्ट 2025) : नवर्यानेच बायकोचा खून केल्याची धक्कादायक घटना परभणीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्नीच्या खुनापूर्वी आरोपी पतीने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटसही ठेवल्याचा प्रकार घडला.
माहेरी आल्यानंतर पतीने केला पत्नीचा खून
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आला. जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनपुर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता. सुमारे चार दिवसांपूर्वी पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला आली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथेही या पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले. ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
आधी स्टेटस ठेवत वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. भर पावसातही संतप्त जमावाने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. महत्वाचे म्हणजे विजय राठोड याने हा खून करण्याआधी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेले स्टेटस ठेवले होते.