चाळीसगावात जेथे माजी नगरसेवकावर हल्ला केला तेथूनच काढली आरोपींची धिंड
आरोपींची दहशत कमी करण्यासाठी चाळीसगावात पोलिसांनी उचलले पाऊल

The accused were arrested from the same place where the former corporator was attacked in Chalisgaon. चाळीसगाव (31 ऑगस्ट 2025) : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून चाळीसगावचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर 26 ऑगस्ट रोजी कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयीत पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना चाळीसगाव पोलिसांनी सोमा उर्फ सागर दगडू चौधरी, सनी उर्फ हरीष आबा पाटील, गौरव आधार चौधरी (सर्व रा.चाळीसगाव) यांना नाकाबंदी करून अटक केली. ज्या भागात आरोपींनी दहशत निर्माण केली त्याच भागातून आरोपींची धिंड काढून जनतेच्य मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्नही या निमित्ताने पोलिसांनी केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
आरोपी 30 रोजी चाळीसगावातील विराम गार्डनकडे कार (एम.एच.05 बी.एल.3153) ने येत असल्याची माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात आली. संशयीत कारमधून सोमा उर्फ सागर दगडू चौधरी, सनी उर्फ हरीष आबा पाटील, गौरव आधार चौधरी (सर्व रा.चाळीसगाव) यांना अटक केली. दरम्यान. नाना उर्फ शिवाजी पाटील मात्र अद्यापही पसार आहे.
आरोपींची काढली धिंड
ज्या पद्धतीने आरोपींनी भरदिवसा माजी नगरसेवकावर हल्ला करून शहरात दहशत निर्माण केली होती, ती कमी करण्यासाठी पोलिसांनी एक कठोर पाऊल उचलले. रविवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पोलिसांनी अटक केलेल्या या तिन्ही आरोपींची शहरातून पायी धिंड काढली. पोलिसांनी काढलेल्या या धिंडीमुळे आरोपींना चांगलीच अद्दल घडली. आरोपींची दहशत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. ही कारवाई पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
आरोपींची धिंड काढल्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कोठडीत पोलीस या हल्ल्यामागील नेमके कारण, इतर आरोपींचा सहभाग आणि वापरलेली शस्त्रे याबाबत सखोल चौकशी करतील. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, चाळीसगाव उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, चाळीसगाव शहर निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलिस तसेच गुन्हा शाखेचे शेखर डोमाळे व सहकार्यांनी केली.