मराठा समाज आरक्षण मागणीला भुसावळातील भीम आर्मीचा पाठिंबा
Bhim Army in Bhusawal supports Maratha community reservation demand भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आता नव्या राजकीय पाठिंब्याची जोड मिळाली आहे. भीम आर्मी व आजाद समाज पार्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला खुलेआम पाठिंबा जाहीर केला आहे शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याची घोषणा केली. जळगाव जिल्ह्यासह राज्यभर सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या या संघटनांनी लोकशाही मूल्यांची जोपासना करत, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
सामाजिक चळवळीतील संघटना
भीम आर्मी भारत एकता मिशन आणि आजाद समाज पार्टी ही सामाजिक चळवळीतून उगम पावलेली संघटना असून त्यांनी स्पष्टपणे संरजामशाही व्यवस्थेला विरोध करत लोकशाही बळकट करण्यासाठी राजकीय क्षेत्रात उडी घेतल्याचे नमूद केले. महाराष्ट्रात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष आपले उमेदवार उभे करणार असून, स्वबळावर लढायचे की समविचारी पक्षांसोबत युती करायची, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली.





मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभर पुन्हा आंदोलनाची गरज भासू लागली असून, शासनाकडून दिरंगाई होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या आंदोलनाला भीम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा युनिटकडून ठोस पाठिंबा देण्यात आला. जिल्ह्यात कुठेही मराठा समाजाचे आंदोलन झाले तर भीम आर्मी त्यात सक्रीय सहभागी होईल, असे जाहीर करण्यात आले. हा निर्णय सामाजिक ऐक्याचे आणि समजूतदारपणाचे दर्शन घडवतो.
त्याचबरोबर भुसावळ रेल्वे विभागातील एससी-एसटी प्रवर्गातील पदोन्नती प्रक्रिया लटकत असल्याचा आरोप करत, संबंधित अधिकार्यांविरोधात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील भिम आर्मीच्या वतीने देण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही रिक्त पदे न भरल्याने हजारो कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे.
ही माहिती भुसावळात आयोजित पत्रकार परिषदेत भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हा प्रमुख गणेश भाऊ सपकाळे व जामनेर तालुका प्रमुख तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे यांनी दिली. पत्रकार परिषदेस जिल्हा उपप्रमुख मुदस्सर खान, जिल्हा सचिव वैशाली पाटील, जिल्हा संघटक संदीप सपकाळे, भुसावळ तालुका प्रमुख जावेद शेख, तालुका उपप्रमुख अल्केश मोरे, तालुका संघटक विशाल वाघमारे यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भीम आर्मी व आजाद समाज पार्टीने घेतलेली भूमिका ही सामाजिक न्यायासाठी आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मराठा आरक्षणासोबतच अनुसूचित जाती-जमातींच्या हक्कासाठीही लढण्याचा निर्धार या संघटनांनी व्यक्त केला आहे
