यावल शहरात बालकाची हत्या करून मृतदेह जाळला : नराधमाला बेड्या ; न्यायालयाने सुनावली कोठडी
Child murdered and body burnt in Yaval city: Man arrested; Court orders custody यावल (7 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवासी पाच वर्षीय बालकाची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे नराधमाने बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह थेट जाळून टाकला व विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पोत्यात लपवला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती व मोठा संतप्त जमाव या भागात एकत्र आला होता. आरोपीच्या दुकानावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यावल पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक करीत रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
काय घडले यावल शहरात ?
शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी मो.हन्नान खान मजीद खान (5) हा मजीद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवार, 5 सप्टेंबर सायंकाळी सात वाजेपासून बेपत्ता होता. बालकाचा सर्वत्र शोध सुरू असताना नातेवाईकांकडे तपास करूनही बालकाचा पत्ता लागत नव्हता मात्र शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बेपत्ता बालकाच्या शेजारी राहणार्या शेख बिस्मिल्ला शेख दस्तगीर (न्हावी) यांनी पोलिसात सांगितले की, त्यांचा मुलगा शेख शाहिद शेख बिस्मिला न्हावी (22) याने त्यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर या बालकाची हत्या केली व त्यास घरात जाळून टाकले व मृतदेह एका तोत्यात लपवला आहे.





पोलिसांनाही बसला धक्का
यावल पोलिसांचे पथक न्हावी यांच्या घरात पोहचल्यानंतर इकडे शहरात घरात बेपत्ता बालकाचा मृतदेह असल्याची माहिती वार्यासारखी पसरली व घटनास्थळी प्रचंड जमाव जमला. जमावास शांत करण्या करीता हाजी शब्बीर खान, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, शरद कोळी, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, अयाज खान, मुस्लिम समाजातील मान्यवरांनी प्रयत्न केले.
आरोपीविरोधात गुन्हा
घटनास्थळी फॉरेेन्सीक पथकाने बारकाईने पंचमाना करून आवश्यक पुरावे हस्तगत केले व मृतदेह शवविच्छेदनाकरीता यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलिसात मयत बालकाचे आजोबा यासीन खान नथ्थे खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.
आरोपीच्या दुकानावर दगडफेक
संतप्त जमावाने खलीफा यांच्या मेन रोडवरील बारी चौकाच्या अलीकडे असलेल्या दुकानावर दगडफेक केली होती. या घटनेनंतर शहरातील व्यावसायीकांनी खबरदारी म्हणून आपापल्या दुकाना बंद केल्या. आरोपीने बालकाची हत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्यात शेख शाहिद यास अटक करीत येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 15 सप्टेंबरपर्यंत आठ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
