लोक परंपराची जपणूक गरजेची व जुनी संस्कृती जोपासणे काळाची गरज : भुसावळात मंत्री संजय सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळ व केशवस्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम : बंजारा समाजबांधवांच्या नृत्याला दाद
भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : लोक परंपराची जपणूक गरजेची असून त्यासोबत आपली पूर्वापार चालत आलेली जुनी संस्कृती जोपासणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत वस्त्रोद्या मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील संतोषी माता सभागृहात सोमवार, 8 सप्टेंबर रोजी आयोजित भुलाबाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
लोक परंपराची जपणूक गरजेची
मंत्री संजय सावकारे पुढे म्हणाले की, बदलत्या आधूनिक काळात लोक परंपराची जपणूक गरजेची आहे. काळानुरूप समाजाने परिवर्तन केले असलेतरी संस्कृती रक्षणासह परंपरा जपण्याची समाज म्हणून आपलीही जवाबदारी आहे. याच अनुषंगाने शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळ व केशवस्मृती प्रतिष्ठानने राबवलेला ‘भुलाबाई महोत्सव’ हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.





निसर्गावर प्रेम करणारा बंजारा समाज
महोत्सवात भिलमळी, ता.भुसावळ जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील जय सेवालाल बंजारा महिला मंडळाचे पारंपरिक नृत्य सादर केल्याने मंत्री संजय सावकारे यांनी भाषणात या समाजाचे विशेष कौतुक केले. खर्या अर्थाने धर्म व संस्कृती रक्षणाचे कार्य आणि निसर्गावरचे प्रेम व्यक्त करणारा हा समाज असल्याचे त्यांनी सांगत त्यांची कृती वंदनीय असल्याचे गौरवोद्गार काढले. पुढे मंत्री सावकारे म्हणाले की, आजच्या आधूनिक काळात शिक्षण निश्चितच अत्यावश्यक आहे मात्र पूर्वीच्या परंपरा लोप पावणार नाही व त्यांची जपणूक होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. भुलाबाई महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीची जोपासना करण्यात येत असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

यांची होती विचार मंचावर उपस्थिती
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्यासह बियाणी स्कूलच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, डॉ.निलीमा नेहेते, कोलते फाउंडेशनच्या राजश्री कोलते, केशवस्मृती प्रतिष्ठानचे संजय हांडे आदींची उपस्थिती होती.
आपल्या धर्मालाही द्या महत्व : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या की, आपल्या संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. आजच्या कॉन्व्हेंटच्या मुलींना भुलाबाई महोत्सव कसा कळणार ? त्यामुळे अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. आजच्या छोट्या मुलींना हा महोत्सव कळाल्यानंतर त्या पुढच्या पिढीला महोत्सवाचे महत्व सांगतील यात शंकाच नाही. आपल्या सणांइतकेत महत्व आपल्या धर्मालाही द्यावे, असे आवाहन रजनी सावकारे यांनी केले.
19 संघांचा सहभाग : विजेत्यांचा सहृदय सन्मान
भुलाबाई महोत्सवात शहर व तालुक्यातील एकूण 19 संघांनी यात सहभाग नोंदवला. प्रथम विजेत्या संघाला 5100, द्वितीय 3100 व तृतीय 2100 तर उत्तेजनार्थ 1100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी करून आभारही मानले. लहान गटासाठी परीक्षक म्हणून दीपा पटेल व अपूर्वा फेगडे व मोठ्या व खुल्या गटासाठी रुपा अग्रवाल व मुकेश खपली यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा असा आहे निकाल
लहान गट (5 ते 10 वर्ष)- प्रथम- तु.स. झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ, द्वितीय- द वर्ल्ड स्कूल, भुसावळ, तृतीय- जिल्हा परिषद शाळा, चोरवड व उत्तेजनार्थ- जिल्हा परिषद शाळा, जोगलखेडा
मोठा गट (11 ते 16 वर्ष)- प्रथम क्रमांक- द वर्ल्ड स्कूल भुसावळ, द्वितीय क्रमांक- जिल्हा परिषद स्कूल, जोगेश्वरी, तृतीय क्रमांक- पुंडलिक बह्राटे हायस्कूल, भुसावळ, उत्तेजनार्थ राघव माध्यमिक विद्यामंदिर, कुर्हेपानाचे, ता.भुसावळ
मोठा गट (11 ते 16 वर्ष)- प्रथम क्रमांक- द वर्ल्ड स्कूल, भुसावळ, द्वितीय क्रमांक- जिल्हा परिषद स्कूल, जोगेश्वरी, तृतीय क्रमांक- पुंडलिक बह्राटे हायस्कूल, भुसावळ, उत्तेजनार्थ राघव माध्यमिक विद्यामंदिर, कुर्हेपानाचे
भिलमळीतील बंजारा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
भुलाबाई महोत्सवात भुसावळ तालुक्यातील भिलमळी येथील बंजारा समाजाच्या महिलांनी विशेष सहभाग नोंदवत प्रथम स्टेजवर आपल्यातील कलागुण सादर केले. एरव्ही शेती-मातीशी निगडीत असलेल्या या समाजातील महिलांनी बंजारा बोलीभाषेत भूलाबाईंचे गाणे पारंपरिक वाद्याच्या तालावर सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. प्रतिष्ठा मंडळाने राबवलेल्या उपक्रमाचे यावेळी बंजारा समाजाच्या महिलांनी विशेष कौतुक केले. वय वर्ष 60 ते 80 वयोगटातील बंजारा महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत नृत्य केले. कधीही मंचावर सादरीकरण न करणार्या बंजारा समाजातील या महिलांना विशेष पारितोषिक देवून मान्यरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
