विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ आयुष्याला आकार देणारे : भुसावळ गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे
Students’ outdoor games shape their lives : Bhusawal Group Development Officer Dr. Sachin Panzhade भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : हल्ली विद्यार्थी हे मैदानावर जास्त खेळतांना दिसत नाही त्यामुळे शालेय दशेत विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांना जास्त महत्व द्यावे, शालेय दशेतील मैदानी खेळ हे आयुष्याला आकार देऊ शकतात, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे यांनी केले. शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या.
कबड्डी स्पर्धा उत्साहात
17 वर्षाच्या आतिल शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ, बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये 17 वर्षाच्या आतील मुलांच्या कबड्डी स्पर्धा झाल्या.





उद्घाटन भुसावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.सचिन पानझडे यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे विभागीय सचिव बी.एन.पाटील, डी.आर.धांडे यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद व (कै) मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले.प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले.
मोबाईलच्या युगात तालुक्यातून एवढे संघ कबड्डी सारख्या खेळांमध्ये सहभागी झाले झाल्याबद्दल सर्वांचे गटविकास अधिकारी सचिन पानाडे यांनी कौतुक केले व स्पर्धेत खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जय-पराजयही आपण पचवावा, असे आवाहन केले.
संगीता बियाणी म्हणाल्या की, विजयी होऊन आपल्या शाळेचे तालुक्याचे जिल्ह्याचे नाव उज्वल करा व भविष्यातील सचीन तेंडूलकर, धोनी कसे बनता येईल याकडे लक्ष केंद्रित करा.
पंच म्हणून डॉ.प्रदीप साखरे व बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नयन सागर मनी, व्ही.एस.पाटील, काजल बारोट, मुकेश मोरे आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी मिलिटरी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले.
