भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचा सातारा हिल मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग


भुसावळ (19 सप्टेंबर 2025) : थरार, रोमांच, प्रचंड जिद्द आणि निसर्गाची अनोखी अनुभूती या सर्वांचा सुरेख संगम असणार्‍या सातार्‍याच्या डोंगरदर्‍यांमध्ये 14 वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन उत्साहात पार पडली. देशभरातून आलेल्या तब्बल 8210 धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारात 21 किलोमीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली. यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल 36 धावपटू देखील सहभागी होते.

स्पर्धेला पहाटे 6.30 वाजता पोलीस परेड मैदानावरून सुरुवात झाली. ’चला जाऊ या सांस्कृतिक वारसा जपूया’ हा संदेश घेऊन धावलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सातारा – कास मार्गावरील यवतेश्वराच्या डोंगरावरून धावताना प्रत्येकाने निसर्गाच्या विहंगम सौंदर्याचा अनुभव घेतला. दाट धुक्याने भेदलेला किल्ले अजिंक्यतारा, हिरवीगार वनराई आणि आदल्या दिवशी झालेला पावसाचा मनमोहक स्पर्श हे सार धावपटूंचा उत्साह द्विगुणित करत होते. असे असले तरी समुद्र सपाटीपासून 1059 मीटर उंचीवर धावतांना व त्यातही परत येतांना अग्निपरीक्षा घेणारे ऊन अंगावर घेऊन या खडतर मार्गावरही थकवा विसरून केवळ अंतिम ध्येयाचा ध्यास घेऊन धावपटू धावत राहिले.






भुसावळच्या धावपटूंनी व त्यातही विशेषतः महिला धावपटूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग घेऊन फिटनेस आणि जिद्दीचा आदर्श घालून दिला. आयोजकांसह पालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व स्वयंसेवकाच्या मदतीने ही स्पर्धा सुरक्षित व यशस्वी पार पडली, ही स्पर्धा केवळ शर्यत नसून तो जिद्दीचा आणि सामर्थ्याचा एक उत्सव असल्याची भावना धावपटूंनी व्यक्त केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सातारकरांनी दिलेले प्रोत्साहन, रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून टाळ्यांचा कडकडाट, ढोल ताशांचा गजर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत धावतांना प्रत्येक धावपटूचे राष्ट्रप्रेम उफाळून येत होते. स्पर्धेच्या मार्गावर असलेला कडेकोट पोलीस बंदोबस्त व ठिकठिकाणी असलेले आरोग्यदूत व रुग्णवाहिका यामुळे अत्यंत खडतर असणारी स्पर्धा कोणत्याही अडथळ्याविना पार पडली.

धावपटूंसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र, तसेच पाणी, चिक्की केळी आदी खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती.हि खडतर धाव पूर्ण करून मैदानावर परतल्यावर जेव्हा सुंदर असे पदक गळ्यात पडले त्यावेळी भुसावळच्या अनेक धावपटूंनी आपण गेल्या चार महिन्यांपासून करत असलेल्या परिश्रमाचे चीज झाले अशी आनंदी भावना बोलून दाखवली.

सहभागी धावपटू
सायली बेंडाळे, दीपा स्वामी, विनिता शुक्ला, किर्ती मोतळकर, वर्षा वाडिले, माधुरी चौधरी,अर्चना चौधरी,ममता ठाकूर, सरला पाटील, मंगला पाटील,संगीता चौधरी,माया पवार,ज्योती सिंग, प्रविण फालक, छोटू गवळी, राजेंद्र ठाकूर,मंगेश चंदन, प्रदीप सोलंकी, विद्याधर इंगळे, मधुकर इंगळे, तेजस चौधरी, मनोज चौधरी, गजानन पाटील, सिमरतपाल सिंग, अनंत पाटील,जगदीश रेहपाडे, डॉ निलेश भिरूड, युवराज सूर्यवंशी, ऍड दिलीप जोनवाल, ऍड निखिल गुप्ता,राहुल चौधरी, चेतन पाटील, डॉ सुयोग तन्निवार, डॉ महेश फिरके, मनोहर पाटील, प्रविण पाटील.

त्याचबरोबर लद्दाख येथे संपन्न झालेल्या 21 किमी अर्ध मॅरेथॉनमध्ये असोसिएशनचे धावपटू संदीपकुमार वर्मा यांनीदेखील यशस्वी सहभाग नोंदविला. या सर्व धावपटूंचे शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील असंख्य नागरिकांनी अभिनंदन केले व शहराचे नाव उंचावल्याबद्दल आनंद व्यक्त केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !