भुसावळात दुर्गोत्सव मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे : पोलिस निरीक्षक राहुल वाघ


Durgotsav Mandals in Bhusawal should install CCTV cameras in the area : Police Inspector Rahul Wagh भुसावळ (26 सप्टेंबर 2025) : शहरातील मिश्रवस्तीतील नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी त्याच्ंया मंडळाच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावावे, कोणीही महिला, मुलींचे व्हीडीओ काढणार नाही याची काळजी घ्यावी, मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावे, अश्या सूचना बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिल्या. दुर्गोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी बाजारपेठ ठाण्यात बैठक झाली.

या सूचनांची करावी अंमलबजावणी
या बैठकीत बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिश्र वस्ती भागातील 20 नवदुर्गा मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य सदस्य उपस्थित होते.सुमारे 30 ते 40 सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलिस प्रशासनाकडून मंडळांना महत्त्वपूर्ण सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

आवश्यक ती खबरदारी घेण्याची ग्वाही
पोलिस अधिकार्‍यांनी प्रत्येक मंडळाच्या मिरवणूक मार्गाची सविस्तर माहिती घेतली तसेच उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे मंडळांना त्यांच्या जबाबदार्‍यांची जाणीव झाली असून नवदुर्गा उत्सवासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असे उपस्थित सदस्यांनी या बैठकीत पोलिसांना सांगितले.

वेळेत विसर्जन पार पाडा : आवाजावर नियंत्रण ठेवा
गणेश विसर्जन मिरवणुकीतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि नवरात्र दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी संध्याकाळी डीजे चालक-मालकांची एक महत्त्वाची बैठक झाली. यात त्यांनी बॅन्जो वाद्यासह पारंपारीक वाद्य वाजविण्याचे आवाहन केले.

वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या
या बैठकीत पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत आलेल्या अडचणींवर चर्चा केली आणि यावेळी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत चुका टाळण्यासाठी योग्य सूचना व मार्गदर्शन केले. वाद्याच्या आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला जवळपास शहरातील 40 ते 45 डीजे चालक-मालक उपस्थित होते. यावेळी शासनाने निर्बंध केलेले गाणे वाजवू नये, वाद्याचा आवाज मर्यादित ठेवावा, डीजे ऐवजी बॅन्जो वाद्य वाजवावा, उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निरीक्षक राहुल वाघ यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !