अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या शारदोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीने वेधले भुसावळकरांचे लक्ष
The immersion procession of Ahilyadevi Girls’ School during Sharad festival attracted the attention of Bhusawalkars भुसावळ (28 सप्टेंबर 2025) : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची यंदाची शारदा उत्सवाची विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात झाली. आपल्या भारतीय परंपरेला आणि संस्कृतीला साजेल, अशी मिरवणूक विद्यालयातर्फे काढण्यात आली.
मिरवणुकीने वेधले लक्ष
मिरवणुकीच्या अग्रभागी चामरधारी विद्यार्थिनी तसेच अश्वारूढ पुण्यश्लोक अहिल्यादेवी व राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वरूपात विद्यार्थिनी होत्या. तदनंतर वारकरी दिंडी, ग्रंथदिंडी.. आणि ढोल ताशांच्या गजरात नऊवारी पातळ व भगवा फेटा अशा मराठमोळ्या पोशाखात लेझीम पथक होते. त्यानंतर लयबद्ध पद्धतीने एका तालासुरात ठेका धरणारे विद्यार्थिनींचे झांज पथक होते. यंदा विद्यालयाने शाळेचे ढोल पथकही तयार केले होते. त्यानंतर भगवा झेंडा हातामध्ये धरून तालासुरात ठेका धरणारे झेंडा पथक होते तसेच डीजेच्या तालावर सांघिक नृत्य करून छोट्या चिमुकल्यांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले.





ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत
मिरवणुकीच्या शेवटी गरबा पथक होते.. त्यानंतर ट्रॅक्टरवर फुलांच्या सजावटीमध्ये देवी शारदाची मूर्ती अशा प्रकारे मिरवणुकीचा क्रम होता. मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध आपल्या संस्कृती तसेच परंपरेप्रमाणे काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ शाळेमधून झाला. त्यानंतर भारत मेडिकल, ब्राह्मण संघ, जामनेर रोड, अष्टभुजा मंदिर येथून गंगाराम प्लॉट, कैलास रेडिओ, डिस्को टॉवर, गणेश हॉटेल, मरी माता चौक येथून विठ्ठल मंदिर वॉर्ड आणि विठ्ठल मंदिरासमोर मिरवणुकीचा समारोप झाला. भुसावळकरांच्या माध्यमातून ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले बर्याच ठिकाणी विद्यार्थिनींना पाणी, सरबत, गोळ्या बिस्किटे वाटप करण्यात आले. गणेश हॉटेल जवळ व्यापारी बांधवांकडून मिरवणुकीतील विद्यार्थी व शिक्षकांना साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. शाळेत आल्यानंतर विद्यालयातर्फे विद्यार्थिनींना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.
