फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल समोर : माजी मंत्री खडसेंच्या जावयाने ड्रग्ज सेवन केलेच नाही !

Forensic test report out: Former minister Khadse’s son-in-law did not consume drugs! पुणे (1 ऑक्टोबर 2025) : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट समोर आला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह आरोपींनी या रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे अहवालातून समोर आले आहे.
काय घडले पुण्यात ?
पुण्यातील खराडी भागात अंमली पदार्थांच्या पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी काही महिलांसह प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य मुद्दा प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते.
फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल समोर
प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती, या चाचणीचा अहवाल आता पोलिसांना मिळाला आहे. या अहवालानुसार, प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी या रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट आहे. या अहवालामुळे प्रांजल खेवलकर यांना ड्रग्स सेवन करण्याच्या आरोपातून मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता
एकनाथ खडसे यांचे जावई असलेले प्रांजल खेवलकर या प्रकरणी तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ येरवडा कारागृहात होते. त्यांना 25 सप्टेंबर रोजी पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दीड महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याने हा मोठा दिलासा मानला जात होता. आता फॉरेन्सिक अहवाल त्यांच्या बाजूने आल्यामुळे हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
खडसे म्हणाले ; जावयाला खोट्या गुन्ह्यात गोवले
प्रांजल खेवलकर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला. प्रांजल खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सेवन केलेले नाही, हे मला आधीपासूनच माहित होते. सहा जणांमध्ये ड्रग्स पार्टी होऊच शकत नाही, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत असे दाखवण्यात आले, शेवटी पोलिस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, असा मोठा दावा खडसे यांनी केला आहे.
खडसे पुढे म्हणाले, प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि ते आता बाहेर आहेत. आता त्यांनी ड्रग्स सेवन केले नसल्याचा अहवाल देखील समोर आला आहे. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात रेव्ह पार्टी आणि ड्रग्स सेवन केल्याचे वातावरण निर्माण केले ते चुकीचं होते. आता अहवाल समोर येतोय, त्यामुळे या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता, असे दिसत आहे. न्यायालयात सर्व बाबी समोर येतील.
