जळगाव पोलिस दलाची मोठी कारवाई : 12 आरोपींकडून दहा कट्टे व 24 जिवंत काडतूस जप्त

Major action by Jalgaon Police Force : Ten rifles and 24 live cartridges seized from 12 accused जळगाव (7 ऑक्टोबर 2025) : गावठे कट्टे वापरणार्यांविरोधात जळगाव पोलिस दलाने धडक कारवाई करीत 16 ते 30 सप्टेंबर या विशेष मोहिमेत 10 देशी कट्टे तसेच 24 जिवंत काडतूस 12 आरोपींकडून जप्त केली आहेत. याबाबतची माहिती जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी माध्यमांना दिली.
अशी झाली कारवाई
समाधान बळीराम निकम (पाचोरा) या संशयीतांकडून दोन कट्टे व एक काडतूस, अनिल मोहन चंडाले (अमळनेर) याच्याकडून दोन कट्टे व चार काडतूस, युवा राजू भास्कर (यावल) याच्याकडून एक कट्टा व दोन काडतूस, अमर देवसिंग कसाटे (भुसावळ) याच्याकडून एक कट्टा व दोन काडतूस, कावीन बाबू भोसले (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) याच्याकडून एक कट्टा व एक काडतूस, विठ्ठल वामन भोळे (जळगाव, ह.मु.पुणे) याच्याकडून एक कट्टा व चार काडतूस, युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (जळगाव) याच्याकडून दोन कट्टे व दहा काडतूस जप्त करण्यात आले.
गुन्हेगारीला अटकाव : आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची
या कारवाईत अटक झालेल्या अनेक आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यात पाचोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान निकम याच्यावर आधीच आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, जळगाव शहरातील गुन्ह्यातील आरोपी युनूस पटेल याच्यावर दोन तर विठ्ठल भोळे याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी वेळेत ही शस्त्रे जप्त केल्याने आगामी काळात घडणारे अनेक मोठे गुन्हे टळले आहेत, असे मानले जात आहे.
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात आली.
