यावलकरांनी दिला एकतेचा संदेश : चिमुकल्याच्या हत्येनंतर दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करणार्‍या मंडळाचा सन्मान


शेख काबीज
यावल (8 ऑक्टोबर 2024) 

मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना,
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा

कवी व शायर अलाम्मा इक्बाल यांच्या या ओवी यावलकरांनी सार्थ ठरवल्या आहेत. यासाठी निमित्त ठरला नुकताच पार पडलेला दुर्गोत्सव. झाले असे की, एका भागातील अल्पवयीनाची हत्या करण्यात आल्यानंतर कुंभारवाडासह बाबूजीपूरा भागात शोककळा पसरली होती. त्यातच आलेल्या दुर्गोत्सवात श्री संत गोरोबा दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सामाजिक भान राखत उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. दुर्गोत्सवाप्रसंगी कार्यक्रमांना फाटा देण्यात आला तसेच वाद्य न वाजता शांततेत माँ दुर्गेची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जोपासलेल्या सामाजिक भूमिकेची दखल कुंभारवाडा व भोईवाडा येथील मोहल्ला बाबूजीपुरा पंच मंडळ व पीडित परिवाराने घेत श्री संत गोरोबा दुर्गा उत्सव मित्र मंडळातील पदाधिकार्‍यांचा सहृदय सन्मान केला.

मंडळाने निर्माण केला आदर्श
चिमुकल्या बालकाच्या हत्येनंतर शहरातील बाबूजीपुरा परिसरात शोककळा पसरली. खुनाच्या घटनेनंतर आलेल्या दुर्गोत्सवात सर्वत्र डीजेचा दणदणाट व कार्यक्रमांची रेलचेल सुरू असताना शहरातील श्री संत गोरोबा दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी संवेदनशीलता दाखवत नवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. दुर्गा स्थापनेच्या दिवशी व मिरवणुकीत वाद्य न वाजवणे, सांस्कृतिक कार्यक्रम न घेणे आणि शांततेत सण साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेत प्रत्यक्षात त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली.

या मानवतावादी भूमिकेबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल पीडित परिवाराने मंडळाचा विशेष सन्मान केला. या प्रसंगी यासीन खान नथ्थे खान, जहीर एस.खान, इनायत जनाब, अजगर खान, माजीद जनाब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अलीम शेख तर आभार नितीन महाजन यांनी मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !