वरणगाव नगरपालिका निवडणूक : नामाप्र आरक्षणामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार
आरक्षण सोडत जाहीर : 21 पैकी 11 जागा महिलांसाठी

Varangaon Municipality Election : Mayoral election will be tough due to NAMA reservation भुसावळ (9 ऑक्टोबर 2025) : वरणगाव नगरपालिकेची निवडणूक तब्बल पाच वर्षांनंतर होत असल्याने विद्यमान पदाधिकार्यांसह इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून आता नगरसेवकांना नगरपालिकेत निवडून येण्याचे वेध लागले आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी वरणगाव नगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. 21 पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव असणार असून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामुळे वरणगावात चुरशीची निवडणूक होईल, असा अंदाज आहे.
यांची सोडत प्रसंगी उपस्थिती
सोडत प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, मुख्याधिकारी सचिन राऊत, उपमुख्याधिकारी रशीद नौरंगाबादी उपस्थित होते. आरक्षण सोडतीची प्रक्रिया निधी झांबरे आणि सिद्धी कोळी यांच्या उपस्थितीत पार पडली.
वरणगाव नगरपालिकेतील एकूण दहा प्रभागांमधून 21 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक 1 ते 9 मधून प्रत्येकी दोन तर प्रभाग क्रमांक 10 मधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. या सोडतीनुसार 21 जागांपैकी 11 जागा महिलांसाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे आहेत वरणगावचे आरक्षण
खुला प्रवर्ग- 6 महिला, 6 सर्वसाधारण
मागासवर्गीय- तीन महिला, तीन सर्वसाधारण
अनुसूचित जाती- दोन महिला, एक सर्वसाधारण
यामुळे या निवडणुकीत महिलांचा प्रभाव ठळकपणे जाणवणार असलातरी पतीराजांना मात्र घरी बसावे लागणार आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे यांच्या प्रभागात अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्याने त्यांना सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी द्यावी लागेल तर माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक यांच्या प्रभागात ओबीसी महिला व सर्वसाधारण आरक्षण असल्याने त्यांना पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे किंवा त्यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारी द्यावी लागेल. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा प्रभाग मात्र सुरक्षित राहिला आहे. पाच वर्षांनंतर होणार्या या निवडणुकीत आरक्षणाच्या नव्या गणितामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
