प्रतिष्ठा महिला मंडळाच्या मेळाव्यातून महिला होणार स्वावलंबी
भुसावळात मान्यवरांचा सूर : प्रतिष्ठा महिला मंडळाच्या तीन दिवसीय मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन

Women will become self-reliant through the gathering of Pratishtha Mahila Mandalभुसावळ (10 ऑक्टोबर 2024) : महिला उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून सलग 13 वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत भुसावळातील महिला समुपदेशक आरती चौधरी व ताप्ती स्कूलच्या प्राचार्य निना कटलर यांनी येथे व्यक्त केले. शहरातील ब्राह्मण संघात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय उद्योजक मेळाव्याचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता वरील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी मान्यवरांनी मेळाव्याबद्दल गौरवोद्गार काढले. दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांच्या आर्थिक सहकार्यातून हा मेळावा होत आहे.
स्थानिक वस्तूंना मिळाली बाजारपेठ
महिला उद्योजक मेळाव्यात दिवाळी सणाला लागणार्या विविध वस्तू एकाच दालनाखाली उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना दिवाळी पदार्थ असो वा सजावटीचे साहित्य हे एकाच छताखाली ब्राह्मण संघात उपलब्ध होईल व शहराची मोठी बाजारपेठ महिलांना या मेळाव्यातून उपलब्ध झाल्याने आयोजकांचे मान्यवरांनी भाषणात तोंड भरून कौतुक केले. सणा-सुदीच्या काळात महिलांच्या हाताला रोजगार मिळाला असून त्या माध्यमातून त्या स्वावंलबीदेखील झाल्याचे दोन्ही मान्यवरांनी मनोगतातून सांगितले. या मेळाव्यात शहर व तालुक्यातील 108 महिलांनी आपले स्टॉल लावले आहेत.
शहरवासीयांनी एक वेळ भेट द्यावी : रजनी सावकारे
शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे 10 ते 12 ऑक्टोबर या काळात ब्राह्मण संघात तीन दिवसीय महिला मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात दिवाळी सणासाठी लागणार्या पणतीपासून ते घर सजावटीचे साहित्य व दिवाळीसाठीचे विविध फराळाचे साहित्य माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील नागरिक व महिलांनी या मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकातून केले.
प्रतिष्ठा मंडळाचा उपक्रम स्तुत्य
प्राचार्य निना कलटर म्हणाल्या की, सेवाभावी वृत्तीने शहरातील प्रतिष्ठा मंडळातर्फे 13 वर्षांपासून राबवण्यात येणारा उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून महिलांच्या चेहर्यावर स्मित हास्य फुलले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच मोफत महिलावर्गाच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होत असल्याने त्यांना रोजगारही मिळाला आहे.
मेळावा ठरला पथदर्शी : अनेकांनी थाटली दुकाने
महिला समुपदेशक आरती चौधरी म्हणाल्या की, रजनीताई सावकारे यांनी प्रतिष्ठा मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त भावनेने 13 वर्षांपासून सुरू केलेला उपक्रम निश्चितपच पथदर्शी आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक महिलांची जाहिरात झाल्याने त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आहे तर अनेकांनी स्वतःची दुकानेही थाटली आहेत.
यांची होती उपस्थिती
यावेळी दुध संघाच्या संचालिका श्यामल झांबरे, माजी नगरसेविका दीपाली बर्हाटे, मीना लोणारी, प्रीतमा महाजन, सोनल महाजन, मीनाक्षी धांडे, शैलजा नारखेडे, प्रीती पाटील, प्रीती कोलते, आरती नेमाडे, यामिनी जावळे, रुपाली सोनवणे, कठोरा सरपंच रोहिणी पाटील, माजी सभापती प्रीती पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी केले.
