शिरपूर तालुका पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव : दोन कट्टे, 11 जिवंत काडतूसांसह चौकडी जाळ्यात

Shirpur taluka police foil robbery plot : Four arrested with two knives, 11 live cartridges शिरपूर (12 ऑक्टोबर 2025) : घातक शस्त्रासह संशयीत दरोड्याच्या उद्देशाने आल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाव घेत चौकडीच्या मुसक्या बांधल्या तर एक संशयीत पसार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील सुळे फाटा परिसरात शनिवार, 11 रोजी रात्री 11.30 वाजता करण्यात आली. आरोपींकडून दोन गावठी कट्टे तसेच 11 जिवंत काडतूस व कार जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना दरोड्याच्या उद्देशाने संशयीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता पोलिसांनी सुळे फाटा येथे सापळा रचत चारचाकी टियागो कार (एम.एच.14 के.डब्ल्यू.8409) मधून चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले तर दुचाकीवरील एक संशयीत अंधारात दहिवदच्या दिशेने पसार झाला.
रेकॉर्डवरील आरोपींना अटक
प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे (27, रा.जाधव नगर, डी.मार्टजवळ, रावेत, पुणे), कृष्णा सुभाष सौराते (20, रा.बिरदवडी चाकण, ता.खेड,, जि.पुणे), अंकुर रमेश कार्ले (25, रा.चांदुस, ता.खेड, जि.पुणे), अनिकेत सुरेश वाळुंज (26, रा.चांदुस, ता.खेड, जि.पुणे) यांना अटक करण्यात आली तर अन्य एक संशयीत पसार झाला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रेकॉर्डवरील आरोपींकडून शस्त्र जप्त
आरोपींकच्या झडतीत दोन गावठी पिस्तुले, 11 जिवंत काडतुसे तसेच चारचाकी कार मिळून तीन लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
