भुसावळात मतदार यादीत सावळा-गोंधळ : दहा प्रभागांमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक !


Confusion in the voter list in Bhusawal : The number of voters is more than the population in ten wards! भुसावळ (12 ऑक्टोबर 2025) : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या मतदार यादीनुसार शहरातील 25 पैकी दहा प्रभागांमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. निवडणुकीसाठी 2011 ची मतदार संख्या गृहित धरली आहे. संपूर्ण शहरातच मतदारांची संख्या वाढलेली दिसणे अपेक्षीत आहे मात्र शहरातील नेमक्या दहाच प्रभागांमध्ये मतदारांची संख्या वाढली कशी? या प्रभागात बोगस मतदार असल्याचा संशय बळावला आहे. यासोबतच आजूबाजूच्या प्रभागातील मतदार संख्याही वाढीव मतदार असलेल्या प्रभागांमध्ये समाविष्ठ झाल्याची शक्यता वाढली आहे. यामुळे मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळाच्या तक्रारी आहेत.

अनेक प्रभागात वाढीव मतदार
2011 च्या जनगणनेनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या एक लाख 87 हजार 421 इतकी आहे. प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका प्रभागात कमाल लोकसंख्या सात हजार 495 असेल. ती काही प्रभाग दहा टक्यांनी कमी अधिक करण्याची शिथीलता आहे. अर्थात जास्तीत जास्त आठ हजार 244 तर कमीत-कमी सहा हजार 746 इतकी लोकसंख्या ठेवणे आवश्यक आहे. या लोकसंख्येचा निकष प्रशासनाने तंतोतंतपणे पाळला गेला मात्र यामुळे मतदार संख्या काही प्रभागात वाढीव आहे.

सावळा-गोंधळ प्रभाग 6 ची 400 नावे आठमध्ये
प्रभाग सहामधील तब्बल 400 नावे प्रभाग क्रमांक 8 च्या भाग दोन यादीत समाविष्ठ करण्यात आली. याबाबतची तक्रार मनसेचे शहराध्यक्ष राहूल सोनटक्के यांनी करुन लेखी हरकत नोंदवली आहे. प्रारुप मतदार यादीतील प्रभाग आठ भाग दोन अनुक्रमांक 10493 ते 10888 हे मतदार वगळून ते प्रभाग सहामध्ये समाविष्ठ करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

प्रभागाच्या बाहेरील नावे समाविष्ठ
अंतिम प्रभाग रचनेत नमूद नसलेल्या गवळी वाडा, सुतार गल्ली, गमाडिया प्रेस, फकिरवाडा न्यु सातारा फाईल, कुटे गल्ली, मामाजी टॉकीज परिसर, महात्मा फुले नगर, हबंर्डीकर चाळ, हिरकणी शेटचा वाडा, इमाम वाडा परीरातील सुमारे 750 पेक्षा जास्त नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 8 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार भाजपचे प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.

सोमवार, 13 ऑक्टोबरपर्यंत हरकतीची मुदत
नगरपालिकेने 8 ऑक्टोबरला प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली. या प्रारुप मतदार यादीवर 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहे. यानंतर सुनावणी होऊन 28 ऑक्टोबरला अंतीम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यामुळे मुदतीपर्यंत मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडेल, अशी शक्यताही राजकिय क्षेत्रात वर्तवली जात आहे.

शेकडो दुबार नावे समाविष्ट
2022 ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यावेळीच्या अंतीम मतदार यादीत व आताच्या प्रारूप यादीत खुप मोठा फरक आहे. प्रभाग आठमध्ये लोकसंख्या पेक्षा जास्त मतदार झाले आहेत ते आले कुठून असा सवाल निर्माण झाला आहे. प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले आहेत, काही ठिकाणी नावे दुसर्‍या प्रभागात लावली गेली आहेत. या सगळ्या प्रकारामुळे अनेक मतदार यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात मतदान करता येणार नाही, ते वंचित राहतील.

या प्रभागात लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक, कंसात लोकसंख्या
प्रभाग 8- 10888 (7960)
10- 7993 (7487)
13- 8554 (7622)
15- 7677 (7665)
16- 8210 (8094)
18- 9552 (7385)
20- 7994 (7398)
21- 8310 (7484)
24- 7913 (7706)
25- 11815 (7600)

प्रशासनाची ध्रुतराष्ट्रासारखी भूमिका
पालिका प्रशासनाची भुमिका ही ध्रुतराष्ट्राप्रमाणे आहे. त्यांना काय चुकीचे होतेय? काय बरोबर आहे हे दिसतच नाही किंबहूना काही राजकीय दबावापोटी ते दिसत नसल्याचे सोंग करतात. प्रभाग आठसह अनेक प्रभागातच मतदार संख्या कशी वाढली? यावर सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मनसे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के म्हणाले.

आक्षेपांवर सुनावणी होणार : मुख्याधिकारी
पालिकेने प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीवर हरकतींसाठी मुदत दिली आहे. यावर हरकती नोंदवल्यानंतर नियमांनुसार पुढील सुनावणी होऊन निर्णय घेतले जातील. ज्यांना आक्षेप असतील त्यांनी ते अंतीम मुदतीपर्यंत नोंदवावे, असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !