कर्जत यार्ड पुनर्रचना कामामुळे भुसावळ-जळगावमार्गे धावणार्या चार गाड्यांच्या मार्गात बदल
भुसावळ (14 ऑक्टोबर 2025) : कर्जत यार्ड पुनर्रचना कामाच्या प्री नॉन-इंटरलॉकिंगसाठी मध्य रेल्वेकडून 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामामुळे काही दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यात भुसावळ व जळगावमार्गे धावणार्या काही गाड्यांचाही समावेश आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ-जळगावमार्गे चार रेल्वे गाड्या वळविण्यात आल्या आहेत, यात जोधपूर – हडपसर एक्सप्रेस ही गाडी उधना-जळगाव-मनमाड-दौंड कॉर्ड लाईन मार्गे धावेल. ग्वाल्हेर -दौंड एक्सप्रेस ही गाडी उधना-नंदुरबार-जळगाव-मनमाड-दौंड मार्गे धावेल. मैसूर -अजमेर विशेष गाडी मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-दौंड-मनमाड-जळगाव-नंदुरबार मार्गे धावेल. तर मिरज -हजरत निजामुद्दीन वातानुकुलीत एक्सप्रेस ही गाडी दौंड-मनमाड-जळगाव-नंदुरबार मार्गे धावेल. या गाड्यांचे वळविलेले मार्ग मनमाड-जळगाव-नंदुरबार मार्गे भुसावळ विभागातून जात असल्याने प्रवाशांनी नियोजन करताना वेळ व मार्ग तपासावा, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले की, हे ब्लॉक्स पायाभूत सुविधा सुधारणा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले आहे.





