रेल्वे प्रवासात स्फोटक, धोकादायक वस्तू नेणारे आरपीएफच्या रडारवर


People carrying explosives, dangerous goods on train journeys are on RPF’s radar भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) ; रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू सोबत नेऊ नयेत, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. रेल्वेतून फटाके नेतांना कोणी आढळल्यास त्या प्रवाशांविरूध्द रेल्वे अ‍ॅक्टनुकार कारवाई केली जाणार आहे.

ज्वलनशील पदार्थ नेणारे रडारवर
आरपीएफ जवानांना त्या दृष्टीने सक्त सूचना केल्या आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा वस्तूंसह प्रवास करणे केवळ कायदेशीर गुन्हाच नाही तर प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.






रेल्वे अधिनियमानुसार रेल्वे गाडीत प्रतिबंधित ज्वलनशील किंवा धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करणार्‍या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तसेच अशा निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीवर अधिक कठोर कारवाई केली जाईल,असेही रेल्वे सुरक्षा बलाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षा जागरूकता वाढविण्यासाठी भुसावळ विभागाने विविध माध्यमांद्वारे जसे पोस्टर,उद्घोषणा,स्टेशनवरील माहिती फलक आणि सोशल मीडिया प्रचार मोहीम हाती घेतली आहे.

प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, फटाके आदी ज्वलनशील वस्तू प्रवासादरम्यान सोबत नेऊ नयेत.

रेल्वे सुरक्षा दल, जीआरपी आणि वाणिज्य विभागातर्फे स्टेशन परिसर व गाड्यांमध्ये तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या सामानाची अनियमित तपासणी नियमितपणे केली जाणार आहे,कोणत्याही प्रवाशाकडे संशयास्पद वस्तू आढळल्यास प्रवाशांनी तत्काळ जवळच्या रेल्वे कर्मचार्‍यास किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर माहिती द्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !