भुसावळातील तापी नदी पात्राच्या परिसरात कचरा जाळल्याने प्रदूषण
Pollution due to burning of garbage in the area of Tapi river basin in Bhusawal भुसावळ (25 ऑक्टोबर 2025) : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापी पात्रात कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहेत. रेल्वेच्या वसाहतीमधून निघणारा कचरा थेट तापी नदीच्या पात्रात टाकला जातो. कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवला जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. शहरवासीयांना कचर्याच्या दुर्गंधीसोबत प्रदूषणाची झळही सोसावी लागत आहे.
तापीत जलप्रदूषण वाढले
शहरात घर ते घर कचरा संकलनासाठी तसेच कचराकुंडीतील कचरा उचलून विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने ठेकेदार नियुक्त केला आहे. शहरात आता कचरा पेटवला जात नाही मात्र तापी काठावरील फिल्टर हाऊस ते स्मशानभुमीच्या दरम्यान रेल्वे वसाहतीतून निघणारा कचरा ट्रॅक्टरव्दारे टाकला जातो. यामुळे तापीचे प्रदूषण वाढत आहे. विशेष म्हणजे हा कचरा पेटवला जात असल्याने तापीकाठाच्या परिसरात नेहमी धुराचे लोट दिसून येत आहेत.





या परिसरातील नागरिकांनी हा कचरा रेल्वे विभागातून येत असल्याची माहिती दिली.शहरातील तापीपात्रातील फिल्टर हाऊस, रेल्वे बंधारा आदी ठिकाणी नागरिक शुध्द हवेसाठी सकाळ, सायंकाळ फिरायला येतात. मात्र याच परिसरात कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरते आहे.फिरण्यासाठी येणार्यांनाही प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.
