भुसावळातील वीज ग्राहकाला महावितरणचा शॉक : घरगुती विजेचे बिल दिले एक लाख 60 हजार


Mahavitaran shocks electricity consumer in Bhusawal : Domestic electricity bill paid Rs. 1 lakh 60 thousand भुसावळ (4 नोव्हेंबर 2025) : शहरात वीज बिलांचा घोळ थांबायला तयार नाही. जुन्या जिनस व इतर कंपनीची खराब झालेली मीटर व नवीन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत. महावितरणने सदोष मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले होते. मीटर बदलल्यानंतर जास्त बिले आल्याची ग्राहकांची तक्रार आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटरबद्दल अनेक दावे करण्यात येत असले तरी यामुळे नागरिकांच्या वीज बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. चुकीचे रिडिंग आणि भरमसाट वीजबिल, घर बंद असतानाही सरासरी वीजबिल भरण्यासाठी महावितरणचा दबाव, वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी, यांसारख्या समस्यांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

लाखाच्या बिलाचा बसला मानसिक धक्का
महावितरण कार्यालयाच्या वतीने ग्राहक गणेश निमसे यांना तब्बल एक लाख 60 हजार 310 रुपये वीज बिल देण्यात आले. हे अवास्तव व भरमसाठ बिल पाहून नियमित वीज देयक भरणार्‍या निमसे परिवाराला मोठा मानसिक धक्का बसला. याहून गंभीर बाब म्हणजे, परिसरातील काही घरांवर प्रत्यक्षात जुने मीटरच अजूनही बसवलेले आहेत, तरीही गेल्या महिन्यांपासून त्यांना स्मार्ट मीटरचे बिल येत आहे. जुन्या मीटरवरील नंबर आणि बिलावरील नंबर यात फरक असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ग्राहकांची एकप्रकारे फसवणूकच होत असल्याचे चित्र आहे. एवढे प्रचंड बिल आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार स्मार्ट मीटरमुळे घडल्याचे समोर आले आहे.






संमती न घेता परस्पर स्मार्ट मीटर बसवले
या प्रकरणात केवळ जास्त बिल येण्याचाच मुद्दा नाही तर महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. जळगाव रोड विभागात अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत की, त्यांची संमती न घेता परस्पर जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. पुणे, मुंबई येथे राहणार्‍या अनेक लोकांच्या बाबतीत परस्पर मीटर बदलल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महावितरणचा हा गलथान कारभार आणि बेजबाबदारपणा यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ’जुने मीटर कोणी आणि कोणाच्या परवानगीने बदलले, याची तपासणी झाली आहे का?’ या गंभीर प्रकाराबाबत महावितरणने तातडीने लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !