भुसावळ पालिकेचे साडेपाच कोटी पाण्यात : एक दिवसानेही रोटेशन झाले नाही कमी
Bhusawal Municipality’s five and a half crores in water : Rotation has not been done even in a single day, less भुसावळ (5 नोव्हेंबर 2025) : नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग पालिकेतर्फे साडेपाच कोटी रुपये खर्चून जीर्ण पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करण्यात आली मात्र त्यानंतर शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असून एक दिवसही रोटेशन कमी न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. दुरुस्तीचा पैसा नेमका खर्च कुठे झाला? कंत्राटदाराने नेमके काय काम केले? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत जनतेच्या हक्काच्या पैशाची झालेली उधळपट्टी कळीचा मुद्दा ठरणार आहे.
गळतीची डोकेदुखी कायम
शहरात गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा भुसावळसाठी नवीन नाही. शहरात दरमहा किमान 200 ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागते. तशा नोंदी पालिकेकडे आहे. गळतीतून अशुद्ध पाणी घराघरात पोहोचते. यामुळे जलजन्य आजारांचा धोका आहे. रोटेशन किमान एक दिवसानेही कमी झाले नाही. शहरात पूर्वीप्रमाणेच 10 दिवसांआड पाणी मिळत आहे. म्हणजेच तापी नदी दुथडी भरुन वाहत असताना शहरात उन्हाळ्याप्रमाणेच पाणीपुरवठा होत आहे.





शिवाय शहरातील अनेक भागांत जलवाहिन्यांच्या गळतीचा प्रश्नही कायम आहे. यामुळे शहरात कृत्रिम टंचाई असते. जीर्ण पाणीपुरवठा यंत्रणेच्या पुनरुज्जीवनानंतर शहरात किमान आठ दिवसांआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. काम सुरू करताना पालिकेने तसा दावा केला होता. प्रत्यक्षात हा दावा कुचकामी निघाला. कारण, पुनरुज्जीवन होऊनही रोटेशन कमी झाले नाही.
