जामनेर संकट मोचकांचेच ! साधना महाजनांची भाजपा नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

भाजपने उधळला विजयाचा गुलाल : पाच जागाही बिनविरोध


Jamner belongs to the problem solvers! Sadhana Mahajan elected unopposed as BJP Mayor जळगाव (20 नोव्हेंबर 2025) : भाजपाचे संकट मोचक व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात लढण्यात येत असलेल्या जामनेरातील नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या साधना गिरीश महाजन या नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजपाने येथे विजयाचा गुलाल उधळला असून अन्य पाच जागाही बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.

निवडणुकीपूर्वीच उधळला गुलाल
जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी येत्या 2 डिसेंबरला निवडणूक होत आहे तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.

जामनेर नगरपरिषदमध्ये भाजपचा विजयाचा गुलाल उधळला गेला आहे. यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जामनेर नगर परिषदेसाठी यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले होते. नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन यांना भाजपतर्फे उमेदवारी होती. साधना महाजन यांना यापूर्वीही जामनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाला भाजप पक्ष श्रेष्ठींकडूनही पसंती होती.

या निवडणुकीसाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी पूर्ण ताकद लावली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. महाजन कुटुंबाचा या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती परंतु तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी गुरुवार, 20 रोजी माघार घेतल्याने साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जामनेर ठरली पहिली नगरपालिका : पाच जागाही बिनविरोध
साधना महाजन यांच्या विजयासह जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील बिनविरोध नगराध्यक्ष निवडणारी पहिली नगरपालिका ठरली आहे. उज्वला दीपक तायडे, किलुबाई शेवाळे, सपना रवींद्र झाल्टे, संध्या जितेंद्र पाटील, आणि नानाभाऊ बाविस्कर अशी आतापर्यंत बिनविरोध झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने आघाडी घेतली असून 27 पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !