पाच हजारांची लाच भोवली : दीपनगरातील अधीक्षक अभियंता जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of five thousand: Superintendent Engineer of Deepnagar in the net of Jalgaon ACB भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : बिल मंजुरीसाठी पाच हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी दीपनगरातील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लाडवंजारी (57) यांच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करून त्यांना जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच दीपनगरात लाच प्रकरणात कारवाई झाल्याने या धाडसी सापळ्याची सर्वत्र चर्चा आहे.
असे आहे लाच प्रकरण
दीपनगर 210 प्रकल्पातील एका कंपनीत तक्रारदार हे साईट सुपरवायझर आहेत. 28 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान 210 प्लांटच्या तळाशी जमणारी राख उचलण्यासाठी तसेच मोडतोड व तेलाचे बॅरेल काढण्यासह वाहतूक करण्यासाठी संबंधित कंपनीने दोन लाख 28 हजार 544 रुपयांचे बिज बीटीपीएस विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे सादर केले होते. आरोपी भानुदास लाडवंजारी याने सदरील बिल मंजुरीसाठी पाच टक्के प्रमाणे पाच हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली.

सापळ्याचा संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
आरोपीवर 29 एप्रिल 2025 रोजी एसीबीने सापळा आणला मात्र संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही मात्र एसीबीच्या लाच पडताळणीत मागणी सिद्ध झाल्याने व वरिष्ठांचा अहवाल येताच गुरुवार, 20 रोजी आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीने पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार किशोर महाजन, नाईक बाळू मराठे, शिपाई अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर, भूषण पाटील आदींच्या पथकाने केली.


