पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर सरकार मेहरबान ! कंपनीला बाजू मांडण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
पुणे (26 नोव्हेंबर 2025) : पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर सरकार पुन्हा मेहरबान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 1800 कोटींचे बाजारमूल्य असलेली जमीन केवळ 300 कोटींत खरेदी करण्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्यानंतर आता शुल्क मुदतवाढ देऊन पुन्हा सरकार मेहरबान झाल्याचे समोर आले आहे.
पार्थ पवारांचा जमीन घोटाळा
हा अब्जावधी रुपयांचा व्यवहार केवळ 500 रुपयांत करणार्या अमेडिया कंपनीला या व्यवहारात 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 21 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावून पंधरा दिवसांची मुदत दिली मात्र मुदत संपण्याच्या एक दिवस आधी कंपनीने आणखी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी कंपनीने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती.



त्यावर विभागाकडून आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. ही मुदतही सोमवार, 24 नोव्हेंबरला संपुष्टात आली मात्र कंपनीने शुल्क न भरता आता वकिलांची नियुक्ती करून कायदेशीर लढाईचा मार्ग निवडण्याचा पर्याय स्वीकारला. वकिलांनी सोमवारी वकीलपत्र दाखल करताना केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबरपर्यंतची मुदत बाजू मांडण्यास दिली आहे.


