भुसावळ पालिका निवडणूक : उमेदवारांना आज चिन्ह वाटप

उमेदवार अथवा प्रतिनिधी यांनाच मिळणार प्रवेश


भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्ह वाटपाची महत्त्वाची प्रक्रिया बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तथा प्रांत कार्यालयात घेण्यात येणार आहे. वाहनांना आवारात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधींनाच सभागृहात प्रवेशाची परवानगी दिली जाणार आहे. अन्य कोणालाही आत सोडले जाणार नाही.

आज सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप
बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता पालिका निवडणूकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी चिन्हासाठी उमेदवार अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या उमेदवारांनाच फक्त आत सोडले जाणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह वाटप पद्धतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह वाटप टप्प्यांनुसार केले जाणार आहे.




तर सोडत काढून निर्णय
सर्वप्रथम 6 राष्ट्रीय पक्ष, राज्यातील 5 नोंदणीकृत राज्य पक्ष तसेच इतर मान्यताप्राप्त राज्य पक्षांना अधिकृत चिन्ह वाटप केले जाईल. त्यानंतर नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. एकाच चिन्हाची अनेक पक्षांनी मागणी केल्यास सोडत काढून निर्णय होईल. कलम 17 नुसार ज्यांना तात्पुरते आरक्षित चिन्ह देण्यात आले आहे, त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना तेच चिन्ह दिले जाईल. अधिकृत आणि अमान्यताप्राप्त पक्षांना चिन्ह दिल्यानंतर उर्वरित उमेदवारांची प्रथम पसंती तपासून, मागणी केलेले चिन्ह इतर कोणी मागितले नसेल तर ते थेट दिले जाईल.

एखाद्या चिन्हाची पहिल्या पसंतीने अनेक उमेदवारांनी मागणी केल्यास ड्रॉ पद्धतीने एकाला चिन्ह देण्यात येईल. प्रथम पसंतीनंतर उर्वरितांसाठी द्वितीय पसंती आणि नंतर तृतीय पसंती हाच क्रम लागू राहील. तीनही पसंतीनंतरही काही उमेदवार उरल्यास त्यांना उपलब्ध चिन्ह वाटप करणार. या टप्प्यात उमेदवारांची पसंतीही विचारात घेतली जाईल.अनेक उमेदवार एकाच चिन्हाची मागणी करत असतील तर चिठ्ठ्या काढून क्रम निश्चित केल्यानंतर चिन्ह वाटप होईल. उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उर्वरित फ्रि सिम्बॉलमधून उर्वरीत चिन्ह वाटप करतील.

सदस्य पदासाठीही समान प्रक्रिया
नगराध्यक्ष पदासाठी कोणाला चिन्ह दिले असल्यास तेच चिन्ह इतर प्रभागात दिले जाणार नाही. अपवाद नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर एखाद्या प्रभागातूनही लढत असेल तर त्याला तेच चिन्ह मिळू शकते. पालिकेच्या निवडणुकीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याने सर्व उमेदवारांनी वेळेत हजर राहण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !