मंत्री संजय सावकारे म्हणाले, भाजपाची सत्ता व नगराध्यक्ष आमचाच होणार ! : आमदार खडसेंसह माजी आमदार चौधरी म्हणाले तुतारीच वाजणार !
गणेश वाघ
Minister Sanjay Savkare said, BJP’s power and the mayor will be ours!: MLA Khadse and former MLA Chaudhary said that the trumpet will sound! भुसावळ (2 डिसेंबर 2025) : तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा मोठी चुरस पहायला मिळाली. सर्वाधिक चुरस लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी झाली. तब्बल आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र प्रमुख लढत भाजपाच्या रजनी संजय सावकारे व महाविकास आघाडीच्या गायत्री भंगाळे (गौर) यांच्यात झाली. भुसावळ पालिका निवडणुकीसाठी एकूण 55 टक्के मतदान झाले. अल्प मतदान कुणाच्या पथ्थ्यावर पडते याचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी लागणार आहे.
सत्ताधारी विरोधकांचा विजयाचा दावा
मंगळवार, 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीनंतर आता भाजपाचे मंत्री संजय सावकारे यांनी आमची सत्ता येईल व नगराध्यक्ष आमचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला तर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी भुसावळात मात्र तुतारीच वाजणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. नेत्यांचे दावे विजयाचे असलेतरी प्रत्यक्षात भुसावळकरांचा कल कुणाच्या बाजूने असणार? याबाबत स्पष्टता रविवार, 21 डिसेंबरच्या निवडणूक निकालाअंती येणार आहे मात्र तोपर्यंत विविध दावे, चर्चांचा गुर्हाळा रंगतच राहणार आहे.
नगरसेवक निवडीचा कौल 21 रोजी कळणार
भुसावळ पालिकेसाठी 25 प्रभागातून एकूण 50 नगरसेवक निवडले जाणार होते मात्र तीन जागा आधीच बिनविरोध निघाल्यानंतर 47 जागांसाठी 240 उमेदवार निवडणूक रिंगणात होते व मतदारांचा कौल आता कुणाच्या बाजूने असेल ? हे आता रविवार, 21 डिसेंबरच्या निकालानंतर समोर येणार आहे.
भुसावळात भाजपाची सत्ता : मंत्री संजय सावकारे
भुसावळकरांनी मतदारांनी शांततेत मतदान केले, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच सर्व पक्षीय लोकांचेही यासाठी मी अभिनंदन करतो. पालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता येईल व नगराध्यक्ष आमचाच होईल, असा विश्वास असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला.
विजयाचा विश्वास : रजनी सावकारे
भुसावळकरांनी लोकशाहिच्या उत्साहात सहभाग घेवून उत्स्फूर्तपणे मतदान केले. भाजपाला बहुमत मिळेल व भाजपाची सत्ता स्थापन होईल हा विश्वास आहे शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, हा विश्वास असल्याचे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी सांगितले.
गायत्री भंगाळे यांचा विजय निश्चित : संतोष चौधरी
भुसावळ शहरात तुतारीचा आवाज घुमला आहे. भुसावळकर जनतेने नऊ वर्षांचा राग मतदानातून काढला असून पाण्यासाठी नऊ वर्ष तरसलेले नागरिक यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. 15 हजारांच्या मताधिक्क्याने आमच्या उमेदवार गायत्री भंगाळे या निवडून येतील, असा विश्वास असल्याचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केला.
आमच्या उमेदवाराचा विजय होणार : नाथाभाऊ
भुसावळात पालिका निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कोण निवडून येईल हे आजच सांगणे कठीण असले तरी आमच्या तुतारीच्या उमेदवार गायत्री भंगाळे या निवडून येतील, असा विश्वास असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


