उद्धव ठाकरे यांचा खळबळजनक दावा : भाजपाचा अॅनाकोंडा शिंदे गटासह राष्ट्रवादीला गिळणार !
Uddhav Thackeray’s sensational claim: BJP’s anaconda will swallow NCP along with Shinde group! मुंबई (6 डिसेंबर 2025) : महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकच आहेत. महायुतीमधील पक्षांच्या नाव व निशाण्या वेगळ्या असल्या तरी त्या भाजपच्या बी टीम आहेत. मी असे म्हणेन की, त्यांचा मालक एकच आहे. भाजपच्या अॅनाकोंडाचा अनुभव आता या पक्षांना येत आहे. हा अॅनाकोंडा आता शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला गिळल्याशिवाय राहणार नाही, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
प्रथमच निवडणुकीचा वाईट अनुभव
शिवसेना ठाकरे गटात शनिवारी मुंबई व उपनगरातील अनेक पक्षप्रवेश झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, विरोधी पक्षनेत्यांचा अभाव, मतदारयाद्यांतील सावळा गोंधळ, भाजपची कथित दंडेलशाही आदी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्या निवडणुकीचा सीजन सुरू आहे. त्यात गडबड घोटाळेही सुरू आहेत. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांचा वाईट अनुभव येत आहे.


सुप्रीम कोर्टाने नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका, पालिका निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घेण्याचे निर्देश दिलेत. पण अजूनही मुंबई व इतर शहरातील मतदारयाद्यांत जो प्रचंड घोळ आहे, त्यावर कुणीच बोलत नाहीत. याची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली पाहिजे.
सुप्रीम कोर्ट भटक्या कुत्र्यांसह इतर प्रकरणांत स्वतःहून लक्ष घालते. पण हा लोकशाहीचा विषय आहे. त्यामु्ळे कोर्टाने स्वतःहून त्यात लक्ष घातले पाहिजे. मतदारयाद्यांतील घोळाविषयी आपण काय करत आहात? हा घोळ निकाली निघत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती आम्ही कोर्टाकडे केली पाहिजे., असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते पदावरून सरकावर घणाघात
उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपद व उपमुख्यमंत्रीपद या दोन गोष्टी आहेत. कारण, विरोधी पक्षनेतेपद हे सरकारने द्यायलाच हवे. आम्ही पहिल्याच अधिवेशनात तशी मागणी केली होती. एक वर्ष होऊन गेले. त्यात सरकारने जाहिरातींशिवाय दुसरे काहीच केले नाही. कदाचित विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहाला वर्षभर विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ असावी. हे सरकार विरोधी पक्ष नेतेपदाला का घाबरत आहे? हे अत्यंत मजबूत सरकार आहे. त्यांना दिल्लीचाही पाठिंबा आहे. त्यांनी अनेक भ्रष्टाचार्यांनाही सोबत घेतले आहे. त्यांच्यावर त्यांनी पांघरूनही घातले आहे.







