यावल तालुक्यातील तरुणाचे खून प्रकरण : आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
Yawal taluka youth murder case : The accused have been remanded to three days of police custody. यावल (11 डिसेंबर 2025) : शहरातून बोरावल जाणार्या रस्त्यावर पाटचारीजवळ जळगाव येथील समता नगर भागातील रहिवाशी 19 वर्षीय तरुणाला जळगाव येथीलच तरुणांनी अडवून इंस्टाग्रामच्या सोशल नेटवर्कवर टाकलेल्या व्हिडिओच्या रागातून त्याला मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी अटकेतील पाच संशयीतांची सहा दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पुन्हा तीन दिवसाची अर्थात 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली. या गुन्ह्यातील पसार संशयीत आरोपी राहुल सोनवणे यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
इंन्स्टाग्राम या सोशल नेटवर्कवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून तुषार चंद्रकांत तायडे (19, रा.बौध्द वाडा, समता नगर, जळगाव) या तरुणावर यावल ते बोरावल रस्त्याने तो जळगाव जात असताना मंगळवारी सायंकाळी हल्ला करण्यात आला व जबर मारहाण झाल्याने जळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री नंतर त्याचा मृत्यू झाला. बुधवारी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत विक्रम पंडितराव सोनवणे (46), अविनाश उर्फ अविनाथ सुकलाल सोनवणे (22), विजय रुपचंद सोनवणे (27, तिघे राहणार सुजदे, ता.जि.जळगाव), निलेश पंडित कोळी (33, रा.बोरनार, ता.जळगाव) व कल्पेश निलेश इंगळे (21, रा.आसोदा, ता.जि.जळगाव) या पाच जणांना यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेेच्या पथकाच्या मदतीने अटक केली. या सर्व पाच जणांना प्रारंभी यावल येथील न्यायालयाने सहा दिवसाची अर्थात 10 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. नंतर या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटी कलम वाढवण्यात आले आणि तपास हा डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्याकडे वर्ग करण्यात आला.


पुन्हा संशयीतांना तीन दिवसाची कोठडी
बुधवारी सर्व संशयीतांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील राहुल शांताराम सोनवणे या संशयीताचा कसून शोध घेतला जात आहे. त्यांच्या शोधार्थ, स्थानिक गुन्हे शाखेसह डीवायएसपीचे विशेष पथक रवाना झाले आहे.







