अट्टल आंतरराज्यीय ‘चद्दर गँग’चा पर्दाफाश : जळगावात घरफोड्या करणार्या चोरट्याला अटक
Notorious interstate ‘Chaddar Gang’ busted : Thief involved in burglaries in Jalgaon arrested जळगाव (15 डिसेंबर 2025) : जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे ‘चद्दर गँग’चा पर्दाफाश करीत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या अटकेनंतर जळगावातील अनेक घरफोड्यांचा उलगडा झाला असून अन्य साथीदारांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. रमेश भुरुसिंग अनारे (27, रा.स्कूल फलिया, गाव तुडा, ता. कुक्षी, धार, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील अलीराजपूर येथे ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील वाढत्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, एएसआय अतुल वंजारी, हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील यांचे पथक तयार करुन चोरट्यांच्या शोधार्थ रवाना केले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, त्यांना हे चोरटे बसने शिरपूरपर्यंत गेले. तेथून त्यांनी एका खाजगी वाहनाने सेंधवार्यंत गेल्याचे पथकाला समजले.


आंतरराज्यीय टोळीचा उलगडा
एलसीबीच्या पथकाने संशयित चोरट्यांचा सेंधवापर्यंत माग काढला. यावेळी त्यांना सेंधवा बस स्थानकातून चोरटे धार जिल्ह्यातील बागताळणा येथे गेल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चद्दर गैंगमधील संशयित चोरट्यांना निष्पन्न केले.
चद्दर गँगमधील संशयित चोरटे निष्पन्न होताच सापळा रचून पथकाने मध्यप्रदेशातील अलीराजपुर येथून संशयित रमेश भुरुसिंग अनारे याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने कुंद्या डावरीया (रा. पटोडा, मोरसिंगे, ता. कुक्षी, जि.धार), बरदान देवका (रा. गोराडीया, ता. कुक्षी, जि. धार), कालू डावरिया (रा. नरवारी, ता. कुक्षी, जि. धार), राहूल डावरिया (रा. भडकच्छ, ता. कुक्षी, जि. धार) व सुनिल परमाती (रा. गेटाबाग तांडा, सर्व रा. मध्यप्रदेश) या साथीदारांच्या मदतीने गोदावरी कॉलेज आणि कुसुंबा शिवारात घरफोडी केल्याची कबुली दिली.
अंगावर चादर ओढून अनवाणी पायाने करतात चोरी
घरफोडी करणारी मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळी ही घरफोडी करतांना अंगावर चादर पांघरुन आणि अनवाणी पायाने चोरी करतात. चोरी केल्यानंतर ते सर्व अंगावरील साहित्य काही अंतरावर फेकून तेथून पसार होत असल्याने पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच ही टोळी चोरी करतांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करीत नसल्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांना कठीण होत असल्याचे समोर आले आहे







