अटकेचे संकट टळले : माणिकराव कोकाटेंना जामीन
The threat of arrest has been averted : Manikrao Kokate granted bail मुंबई (19 डिसेंबर 2025) : सदनिका घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेल्या माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील अटकेचे संकट तूर्त दूर झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कोकाटे दोषी असल्याचे कोर्टाने मान्य करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही त्यामुळे तूर्तास त्यांची तुरुंगवारी टळली असून आमदारकीवरची टांगती तलवार कायम आहे.
कोर्टात जोरदार युक्तिवाद
मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद झाला. कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोकाटे यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा, अशी मागणी केली तर सरकारी वकिलांनी म्हटले की कोकाटे यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी झाला असूनही कोकाटे सरेंडर झाले नसल्याचे म्हटले आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर झाली.

आर्थिक परिस्थिती बदलत असते : रवींद्र कदम
रवींद्र कदम यांनी माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडताना म्हटले की, घर मिळाल्याची तारीख आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक परिस्थिती बदलत असते. यावर पीडब्लूडीने काय क्रॉस एक्झॅमिनेशन केले आहे तेही बघून घ्या, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. तसेच कदम यांच्याकडून कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती कशी बदलली आहे याचे जुने आणि नवे संदर्भ मांडण्यात आले आहेत.
माणिकराव कोकाटे आयसीयूमध्ये
माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोकाटे यांचे मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले. कोकाटे सध्या आयसीयूमध्ये अॅडमिट असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. तसेच कोकाटे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती कदम यांनी दिल्याने कोकाटे यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा देण्यात यावा, असा युक्तिवाद रवींद्र कदम यांनी केला आहे. तसेच कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या, असाही युक्तिवाद कदम यांनी केला.







