ऑर्डनन्स फॅक्टरींचा देशव्यापी संप तूर्त मागे
सोमवारपासून संरक्षण उत्पादन पूर्ववत सुरू होणार
भुसावळ : केंद्र सरकार आयुध निर्माणीचे कार्पोरेशन करून खाजगीकरण करण्याच्या तयारीत असल्याने भुसावळसह वरणगांव फॅक्टरीतील कामगार युनियन, इंटक युनियन व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तिन्ही मान्यताप्राप्त संघटनांनी 20 ऑगष्टपासुन एक महिन्यांच्या संपाची हाक दिली होती मात्र चार दिवसीय संपानंतर फेडरेशनच्या नेत्यांची रक्षा सचिव अजय कुमार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आयुध निर्माणींना 30 हजार कोटींचे देण्याचे मान्य करण्यात आले व निगमीकरणाचा विचार सरकारचा असलातरी अद्याप मात्र निर्णय न झाल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर फेडरेशनने संप मागे घेतला असून सोमवार, 26 रोजी सकाळी सहा वाजेपासून कर्मचारी कामावर पूर्ववत रूजू होणार आहेत.
सरकारच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष
देशातील रक्षा उत्पादनात सध्या 41 आयुध निर्माणी, 9 शिक्षण संस्थां मधील एक लाख कर्मचारी संपावर गेले होते. निगमीकरणाला या आधी कामगार संघटनांनी विरोध केला असतांना सरकार निर्णयावर ठाम असल्याने कामगारात असंतोष निर्माण झाला होता. वरणगाव फॅक्टरीत सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार नागेंद्र तायडे, दत्तात्रेय कुलकर्णी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. संपकाळात आमदार संजय सावकारे, पीआरपी महामंत्री जगन सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी नगरसेवक राजेंद्र चौधरी आदींनी भेटी दिल्या. संपाच्या 5 दिवसात घोषणा, अर्धनग्न आंदोलन, अधिकार्यावर बांगड्या फेकणे व परीवारासहीत आंदोलन करण्यात आले.
वरणगावात यांचे परीश्रम
संप यशस्वीतेसाठी बी.बी सपकाळे, शरद पाटील, देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, रवी देशमुख, किरण पाटील, सुनील महाजन, विशाल भालशंकर, राजेन्द्र शेटे, प्रवीण पाटील, गणेश भंगाळे, के.के.सिंग, सुधीर गुरचल, सचिन झोपे, लक्ष्मण तायडे, संतोष बार्हे, मनीष महाले, सुहास विभांडीक, दीपक पाटील, वाल्मिक खोरकड, प्रशांत ठाकूर, रवी बोरसे, डी.एम.पाचपांडे, योगेश सुर्यवंशी, हर्षल सुतार, महेश देशमुख, निलेश घुले, जयश्री झोपे, योगेश ठाकरे, अर्चना बोरोलेंसह कामगार, इंटक, भा.म.संघाच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.
26 रोजी कामगार कामावर रूजू होणार -राजेंद्र झा
रक्षा उत्पादन सचिवांनी लेखी दिले असून आयुध निर्माणीच्या कॉपोरेशनबाबत अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही, निगमीकरणानंतर देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने व यापूर्वीच्या मंत्र्यांनी लिखीत स्वरूपात तसे होणार नसल्याचे लिखीत दिल्याने तसेच वार्षिक उत्पादन 30 कोटी रुपये देण्यासह अन्य मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती फेडरेशनसोबत निर्णय करून चर्चा घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने 26 पासून कामगार कामावर रूजू होतील, असे ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र झा यांनी कळवले आहे.