नाशिक रोड कारागृहात दोन कैद्यांकडे सापडले लाखाचे ड्रग्ज : बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह
Drugs worth lakhs of rupees were found with two prisoners at Nashik Road Jail: raising questions about the security arrangements नाशिक (20 डिसेंबर 2025) : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक रोड कारागृहाच्या कडक बंदोबस्ताला सुरुंग लावत दोन कैद्यांकडून एक लाख सात हजार 800 रुपये किंमतीचे अंमलमी पदार्थ व साहित्य जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन कैद्यांसह एका अज्ञात इसमाविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दलात कारागृहात सापडलेल्या ड्रग्जमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नाशिक कारागृहात
10 डिसेंबर रोजी सकाळी 9.40 वाजेच्या सुमारास कारागृह प्रशासनाकडून नियमित तपासणी सुरू असताना मंडल क्रमांक सातमधील यार्ड क्रमांक 1 आणि 4 मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपासणी पथकाने जेव्हा बंदी दिलीप कचरू सोळुंके याची बारकाईने झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे असलेला अंमली पदार्थांचा साठा पाहून अधिकारीही अवाक झाले. त्याच्याकडे 104 ग्रॅम चरस, 31.5 मिलीग्रॅम गांजा सदृश पदार्थ, 4 मिलीग्रॅम एम.डी. आणि अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारे 15 रोलिंग पेपर असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वप्नील दिनेश उनवणे याच्या सांगण्यावरून एका बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे अमली पदार्थ अत्यंत बेकायदेशीर मार्गाने कारागृहाच्या आत पोहोचवले.. कारागृहाच्या तटबंदी आणि चोख पहारा भेदून हे अंमली पदार्थ आतमध्ये आलेच कसे, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या घटनेमुळे नाशिक रोड कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले असून, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.







