भाजपाचा दारुण पराभव : यावल नगराध्यक्षपदी उबाटाच्या छाया अतुल पाटील
आमदार अमोल जावळेंचा प्रभाव पडला फिका : विजयानंतर उमेदवार समर्थकांचा जल्लोष
BJP suffers a crushing defeat: Chhaya Atul Patil of the Uddhav Balasaheb Thackeray faction elected as the Mayor of Yawal यावल (21 डिसेंबर 2025) : यावल नगरपालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला नाकारत नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना कौल देत विजयी केले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे पाच हजारांहून अधिक मतांनी येथे पराभव झाला. आमदार अमोल जावळे यांचा प्रभावही येथे फिका पडल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
विशेष म्हणजे नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या छाया अतुल पाटील यांचे पती अतुल पाटील यांचाही प्रभाग 11 मध्ये 200 मतांनी पराभव झाला. या प्रभागातून हेमराज फडे निवडून आले.

भाजपाला जनतेने नाकारले : छाया पाटील नगराध्यक्षपदी
यावल नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला तब्बल 19 दिवसांचा विलंब झाला. रविवारी यावल तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मतमोजणी शांततेत पूर्ण करण्यात आली.
निकालानुसार उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी एकूण 14 हजार 50 मते मिळवली, तर भाजपच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांहून कमी मते मिळाली. या मोठ्या मताधिक्यामुळे छाया पाटील यांचा विजय दणदणीत ठरला. त्यांनी यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.
विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावल शहरात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.
या विजयामुळे यावल नगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून छाया अतुल पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
