निवडणूक विश्लेषण : खडसे-चौधरींना निपटून घेण्याची भाषा ; रखडलेली अमृत योजना भुसावळात ठरली भाजपासाठी ठरले पराभवाचे कारण

मुख्यमंत्र्यांची सभा ठरली फेल : भाजपाच्या सत्ताकाळातील विकासकामे न झाल्याचा राग मतपेटीतून व्यक्त


गणेश वाघ
Election analysis : The rhetoric of eliminating Khadse and Chaudhary; the stalled Amrut scheme in Bhusawal proved to be the reason for BJP’s defeat. भुसावळ (21 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांनी आमदार एकनाथराव खडसे-माजी आमदार संतोष चौधरींविषयी केलेली ‘निपटून घेण्याची भाषा’, नऊ वर्षानंतरही रखडलेली अमृत योजना, निष्ठावान भाजपेयींची कापलेली तिकीटे व अ‍ॅन्टी इन्कमबन्सी फॅक्टरचा फटका यामुळे भुसावळात भाजपा उमेदवार रजनी संजय सावकारे यांचा पोषक वातावरण असूनही पराभव झाला तर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी झाल्या.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात केवळ भुसावळात झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा येथे फेल ठरली तर मंत्री संजय सावकारे व मंत्री गिरीश महाजनांनी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपाचे कमळ उमलणार असल्याचा दावा फोल ठरला. भुसावळात माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर तसेच चौधरी बंधूंवर झालेल्या सातत्याने झालेल्या टीकेनंतर त्यांनी निवडणूक मनावर घेतल्याने येथे बदल घडल्याचे जाणकारांना वाटते.

‘निपटून घेवू’ भाषा लागली जिव्हारी
जळगावात माध्यमांशी बोलताना मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळात चौधरी-खडसे एकत्र आल्यानंतर त्यांची अभद्र युती असल्याचे त्यांना निपटून घेवू, अशी भाषा वापरल्याने त्यांच्याविषयी रोष वाढला. खरे तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आजही लेवा समाजावर प्रभाव आहे शिवाय अनेक वर्ष पालिकेवर सत्ता भोगलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांना मानणारा मोठा वर्ग आजही भुसावळात आहे. दोन्ही नेत्यांना खरे तर ही भाषा रुचली नाही.

शहराला मंत्री पद मात्र भुसावळकर पाण्यासाठी तरसले
सलग चार टर्म आमदार व काही वर्षांपासून मंत्री पदावर असलेले संजय सावकारे यांच्या नेतृत्वात गत काळात भाजपाने पालिकेवर सत्ता मिळवली व रमण भोळे नगराध्यक्ष झाले मात्र सात ते आठ वर्षानंतरही अमृत योजनेचे टप्पा एकचे काम पूर्ण करण्यात यश आले नाही व पाणी उशाला असूनही भुसावळकर तहानलेले असल्याने सत्ताधार्‍यांविषयी रोष वाढला. मंत्री संजय सावकारे असतानाही त्यांचा प्रभावाने शहरात अमृत योजना पूर्ण होवू न शकल्याची टीका विरोधकांनी केली व नागरिकांमध्ये देखील अमृत योजना पूर्ण झाली नसल्याने प्रचंड नाराजी दिसून आली. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरींनी रमण भोळे नगराध्यक्ष असतानाच्या भ्रष्टाचाराच्या ‘भुसावळ फाईल्स काढून’ लक्ष वेधत भाजपाची कोंडी केली.

चौधरी बंधूंना घेतले अंगावर
माजी आमदार संतोष चौधरी यांच्यामुळे राजकारणात आलेल्या आमदार संजय सावकारे यांचे नेतृत्व गेल्या 20 वर्षांपासून भुसावळकरांनी स्वीकारले आहे. शांत व संयमी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मात्र राजकारणात विळा-भोपळ्याचे नेते असलेल्या चौधरी बंधूंनाही मंत्री सावकारे यांनी या निवडणुकीत अंगावर घेतल्याने चौधरींनी आक्रमक भूमिका घेत सावकारेंच्या पराभवासाठी रणनिती आखली. अनिल चौधरींचा उल्लेख करताना ‘कोण अनिल चौधरी’ असेदेखील सावकारे म्हणाल्याने चौधरींसाठी ही बाब जिव्हारी लागली.

विरोधकावर आरक्षणावर टीका : निष्ठावंतांचे तिकीट कापले
भुसावळ पालिकेचे आरक्षण एससी प्रवर्गासाठी राखीव निघाल्यानंतर विरोधकांनी या विरोधात रान उठवून जोरदार टीका केली व आरक्षण मॅनेज असल्याचा व घराणेशाहीचा आरोप सावकारेंवर केला तसेच मतदारांच्या मनात हा मुद्दा पटवून देण्यात विरोधक यशस्वी झाले. येथे लेवा समाजाच्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचा मेसेजही विरोधकांनी मतदारांपर्यंत पोहोचवला. विशेषतः शहरात लेवा समाजाचा मोठा प्रभाव असताना भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे तसेच ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक प्रा.दिनेश राठी यांचे तिकीट भाजपाने कापून लेवा समाजासह व्यापारीवर्गाचा रोष ओढवून घेतल्याचे दिसून आले.

बिनविरोध उमेदवार भाजपासाठी डोकेदुखी
भुसावळात भाजपाच्या रजनी सावकारेच निवडून येतील, असे चित्र पहिल्या दिवसापासून शहरात दिसून येते असलेतरी भाजपाने चार जागांवर नगरसेवक बिनविरोध करून आणले व हीच बाब भाजपासाठी डोकेदुखी ठरली. नगरसेवक बिनविरोध झाले नसतेतर त्यांनी जीवाचा आटापाटा करून भाजपाच्या वरच्या जागेासाठी मतदान बाहेर काढले असते अर्थात बिनविरोध नगरसेवकांनी काम केले नाही, असे नाही मात्र तितकासा प्रभाव मतमोजणीतील निकालातून दिसून आला नाही. भुसावळात झालेल्या अल्प मतदानाचा फटका भाजपाला बसल्याचे निकालावरून दिसून येते.

मुख्यमंत्र्यांची सभा : मतविभाजनाचाही भाजपाला फायदा नाही
भुसावळात रजनी सावकारे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत वातावरण निर्मिती केली व आश्वासने दिली मात्र सभादेखील मतदारांनी फेल ठरवली. रजनी सावकारेंना न मिळणारी आंबेडकरी समाजाची मते अनेक ठिकाणी विभाजीत करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली. ठरापगड जाती, कॅबिनेट मंत्री, भाजपासाठी पोषक वातावरण असतानाही भाजपाला येथे अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने थेट मुस्लीम महिलेला तर काँग्रेसने एससी उमेदवार दिल्यानंतर त्यांचाही फारसा या निवडणुकीत प्रभाव दिसून आला नाही.

भुसावळकरांना आता विकासाची अपेक्षा
भुसावळ पालिकेत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी उमेदवार गायत्री भंगाळे निवडून आल्या आहेत तर सत्तेत भाजपाचे 27 नगरसेवक आले आहेत शिवाय शिंदे सेना व काही अपक्ष भाजपासोबत जातील यात शंका नाही मात्र मूळ मुद्दा आहे तो शहराच्या विकासाचा. चौधरी-खडसेंच्या हातात सत्तेच्या चाव्या असल्यातरी आगामी काळात पालिकेत अनेक आव्हाने नेत्यांपुढे आहेत. त्यातच केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने या सार्‍यांशी जुळवून घेताना रखडलेल्या अमृत योजनेला चालना, रखडलेली रस्त्यांची कामे, शहरातील सर्वात मोठी कचर्‍याची डोकेदुखी, बंद पथदिवे, ठेकेदारांची मक्तेदारी आदी समस्या आता सुटतील काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. पालिकेत नागरिकांची कामे सहज होतील, त्यांची अडवणूक होणार नाही यासाठी आता नेत्यांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत, असा जनतेचा सूर आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !