मुक्ताईनगरात ‘खडसे कुटूंबाला’ धक्का ; आमदार पाटलांचा दबदबा : नगराध्यक्षपदी संजना पाटील विजयी
गणेश वाघ
A setback for the ‘Khadse family’ in Muktainagar; MLA Patil’s dominance prevails : Sanjana Patil wins the mayoral election मुक्ताईनगर (21 डिसेंबर 2025) : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अख्खे खडसे कुटूंब रिंगणात उतरल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी मुलगी संजनाला शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातूना उमेदवारी दिली व ताकद लावून निवडूनही आणले. शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील या दोन हजार 436 मतांनी विजयी झाल्या तर भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भावना ललित महाजन (6486) यांचा पराभव झाला आहे. केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना या निकालाने होम पिचवर मोठा धक्का बसला आहे.
खडसे कुटूंबाची खेळी निष्प्रभ
राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते असलेल्या आमदार खडसेंनी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीची ताकद नसल्याचे कारण देत निवडणूक रिंगणातून माघार घेतली मात्र त्यांच्याच पक्षातील उमेदवारांनी भाजपात ऐनवेळी प्रवेश करीत शिंदे गटापुढे आव्हान दिले व आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील भात्यातील बाण काढत ऐनवेळी मुलगी संजनाला नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवले. वास्तविक येथे भाजपाची शिंदे गटाशी लढाई होती मात्र या लढाईत आमदार खडसे, रोहिणी खडसेदेखील उतरल्याचे दिसून आले. लढाई भाजपाची की खडसे कुटूंबाची अशी टीका देखील विरोधकांनी केली व यामुळे मतदारदेखील संभ्रमात पडले.

एकीकडे युती तर दुसरीकडे सरळ लढत
एकीकडे सावदा नगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती झाली तर याच मतदारसंघातील मुक्ताईनगर नगरपंचायतीत युती फिस्कटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी यासाठी एकमेकांना जबाबदार धरले. त्यानंतर येथे लढत ‘हाय व्होल्टेज’ होणार असल्याचे संकेत मिळाले व झालेही तसेच!
सुनेसाठी सासर्यांचीही प्रतिष्ठा पणाला
निवडणुकीत मुक्ताईनगरातील गुन्हेगारीवर जोरदार घमासान झाले तर प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. खडसे कुटूंबावर आरोप होताच आमदार एकनाथराव खडसेदेखील सरसावले व त्यांनी ही लढत आता पक्षाची नसून कुटूंबाची झाल्याचे त्यांनी सांगत प्रचाराचा आखाडा गाजवला. नाथाभाऊ हे एकीकडे तर आमदार चंद्रकांत पाटील हे दुसरीकडे असा जंगी सामना सुरू झाला. निवडणुकीच्या आदल्या दिवसापासून तर दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांमध्ये धुसफुस सुरू झाली. मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने गुन्हेही दाखल झाले.
आमदार चंद्रकांत पाटील धरले ‘धूरंधर’
मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक ही राज्यभरात गाजली. विशेष करून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी विजयासाठी ताकद लावली. निवडणुकीची सूत्रे हाती घेतली व प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांची सभाही लावण्यात आली मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून आला नाही. प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार कन्या संजना चंद्रकांत पाटील यांनी बाजी तर मारलीच पण शिवसेनेला नगरपंचायतीत स्पष्ट बहुमत देखील मिळाले. हा शिवसेनेसाठी आनंदाचा डबल बार ठरला. अर्थात या यशाचे शिल्पकार व धूरंधर म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नार कोरले गेले.
आमदारांनी बालेकिल्ला केला मजबूत
नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला ते अजून मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जातील, यात शंकाच नाही. मुक्ताईनगरात विजयाचे शिल्पकार व खरे ‘धुरंधर’ आमदार चंद्रकांत पाटील हेच ठरले यात कोणतीही शंका नाही.
