भुसावळ पालिका निवडणूक : नगराध्यक्षांसह नगरसेवकांना 3904 मतदारांनी नोटांचे बटन दाबत नाकारले
Bhusawal Municipal Election : 3904 voters rejected the mayor and councilors by pressing the NOTA button. भुसावळ (22 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरण निवडणूक पार पडली व रविवारी निकाल हाती आले. तब्बल नऊ वर्षानंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. रस्ते, पाणी, कचरा, पथदिवे आदी मूलभूत समस्याही न सुटल्याने मतदारांनी आपला राग ईव्हीएममधून व्यक्त केल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष पदासाठी एक हजार 148 तर नगरसेवकांसाठी दोन हजार 756 मतदारांनी नोटांचे बटन दाबत आपला रोष व्यक्त केला. या निवडणुकीत एकूण तीन हजार 904 मतदारांनी नोटांचे बटन दाबत उमेदवार निवडून देण्यात रुची नसल्याचे दाखवून दिले.
भाजपा उमेदवाराचा पराभव
शहरातील प्रभाग 25 मध्ये सर्वाधिक 257 मतदारांनी नोटाचा उपयोग केला तर प्रभाग चारमध्ये फक्त 9 मतदारांनी या बटनाचा उपयोग केला आहे. पालिका निवडणूकीची मतमोजणी रविवारी तहसील कार्यालयात पार पडली. यात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांना पराभवाचा सामना करावा लागला व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री गौर-भंगाळे विजयी झाल्या. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीच नाही तर नगरसेवकांसाठी सुध्दा मतदारांनी नोटा बटन दाबून नकारात्मकता दर्शविली.

मतदारांमध्ये मतदानासाठी जागृतता निर्माण करण्यात आली. शासनातर्फे विविध जनजागृतीचे कार्यक्रम विविध शाळा, बँका, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी राबवण्यात आले मात्र हवे तसे मतदान झाले नाही व मतदानाचा टक्का घसरला. जे मतदान झाले, त्यातही नोटांच्या बटनाचा अधिक उपयोग मतदारांनी केला.
