भुसावळातील विषबाधा प्रकरण : मुंबईसह नागपूरातून आले डॉक्टर

अन्नाचे घेतले नमूने : शंभरावर प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांवर उपचार


गणेश वाघ
Food poisoning incident in Bhusawal: Doctors have arrived from Mumbai and Nagpur भुसावळ (30 डिसेंबर 2025) : शहरातील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास 80 ते 100 प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांना अन्नातून भीषण विषबाधा झाल्यानंतर त्यांच्यावर खाजगीसह रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्येचा आकडा फुगत असल्याने नागपूरसह मुंबईहून प्रत्येकी दोन डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे तर ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये जेवण केल्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर तेथील स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर अन्नाचे नमूनेही घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाईची दिशा ठरणार आहे.

काय घडले भुसावळात ?
भुसावळ शहरातील रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोकोपायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड आणि तिकीट तपासणी कर्मचारी अशा विविध पदांवरील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते व ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये संबंधित कर्मचारी जेवण करतात. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक अनेक प्रशिक्षणार्थींना उलट्या आणि मळमळ, हगवणुकीचा त्रास सुरू झाला. अवघ्या काही वेळातच बाधितांचा आकडा 80 ते 100 वर पोहोचल्याने प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण पसरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केल्या आणि सर्व बाधितांना रेल्वे रुग्णालयात हलवले.

अन्नातून झाली विषबाधा ?
कर्मचार्‍यांनी सोमवारी रात्रीच्या जेवणात भेंडी, राजमा, भात, दाळ, हलवा आदी पदार्थ खाल्ले मात्र या जेवणानंतरच त्यांना त्रास झाल्याचे अनेक कर्मचार्‍यांनी सांगितले त्यामुळे प्राथमिक कारण अन्नातून विषबाधा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डीआरएम यांनी घेतली भेट
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक डीआरएम विपुल अग्रवाल यांनी रेल्वे रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर विपुल अग्रवाल यांनी आपल्या संपूर्ण ताफ्यासह ‘अन्नपूर्णा’ मेसची प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणी दरम्यान अन्नाचे विविध नमुने (सॅम्पल्स) घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबईसह नागपूरातून आले डॉक्टर
रेल्वे रुग्णालयात वाढलेला रुग्णांचा आकडा पाहून व उपलब्ध डॉक्टर्स व नर्सची संख्या पाहता मुंबईहून दोन डॉक्टर व आठ कर्मचारी स्टाफ तसेच नागपूरहून दोन डॉक्टर्स व चार स्टाफ पाचारण करण्यात आला. अनेक बाधीत प्रशिक्षणार्थ्यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

नमूने आल्यानंतर कारवाई शक्य
कर्मचार्‍यांना इतक्या मोठ्या संख्येने विषबाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली? हे अहवाल आल्यानंतरच कळणार असून त्यानंतर संबंधित मेस चालकावर कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितले. अधिकार्‍यांनी मेसमधील स्वच्छतेचीदेखील पाहणी केली असून आता पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

एनआरएमयू संघटना आक्रमक
रेल्वे कर्मचार्‍यांना विषबाधा झाल्यानंतर एनआरएमयू संघटना शहरात आक्रमक झाली आहे. या प्रकाराविरोधात एनआरएमयू संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रशिक्षण संस्थेजवळील कॅन्टीनजवळ निदर्शनेही केली.

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !