भुसावळातील रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भेंडीत अळ्या निघाल्यानेच विषबाधा ! ; 250 रुपये आकारूनही मिळतेय निकृष्ट जेवण
तक्रारींकडे कानाडोळा करणार्या ठेकेदारावर हवी कठोर व कायदेशीर कारवाई : 150 हून अधिक कर्मचार्यांवर उपचार : तर नापास करण्याची मिळते धमकी
गणेश वाघ
Food poisoning at the railway training institute in Bhusawal was caused by worms found in okra! Despite charging 250 rupees, substandard food is being served भुसावळ (31 डिसेंबर 2025) : भुसावळातील रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भेंडीत अळ्या निघाल्याने कर्मचार्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षण संस्थेतील जेवणाचा दर्जा सातत्याने निकृष्ट असल्याच्या तक्रारी करूनही प्रशासनाने कधीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांनी करीत यापुढे अचानक तपासणी करावी तसेच अन्न पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी कर्मचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्यांनी अन्नपूर्णा मेसची तपासणी का केली नाही? ठेकेदारावर ही मेहरबानी का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकार्यांची आता चौकशी होवून कारवाई होणार का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
150 हून अधिक कर्मचार्यांना त्रास
भुसावळ रेल्वेच्या क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थेत (झोनल ट्रेनिंग सेंटर) रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. सोमवार, 29 रोजी रात्री दिलेल्या जेवणातून 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचार्यांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे दोन वाजेपासून कर्मचार्यांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, चक्कर येणे असा तीव्र त्रास सुरू झाला व अनेकांना रेल्वे रुग्णालयात दाखल करावे लागले.

अळ्या पडलेल्या भेंडीतून विषबाधा ?
सोमवारी सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत प्रशिक्षणार्थींना पोळी, डाळ, राजमा, भेंडीची भाजी, भात, पापड व सुजी हलवा असे जेवण देण्यात आले. जेवण केल्यानंतर सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या खोल्यांमध्ये झोपले मात्र मध्यरात्रीनंतर अवघ्या काही तासांतच अन्नातून विषबाधेची लक्षणे दिसू लागली. पहाटे चार वाजेपर्यंत अनेक कर्मचार्यांची प्रकृती खालावली तर काहींना सकाळी गंभीर त्रास जाणवू लागला. यामुळे पहाटे तीन वाजेपासून प्रशिक्षण केंद्राच्या होस्टेलमधील कर्मचारी जागी झाले. बहुसंख्य कर्मचार्यांना त्रास होऊ लागल्याने तेथे असलेल्या औषधालयातून गोळ्या देण्यात आल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली.
नांदेडच्या कंत्राटदाराचा ठेका
रेल्वे ट्रेनिंग संस्थेतील जेवणाचा ठेका हा नांदेड येथील एका व्यक्तीने घेतला असल्याचे तेथील कर्मचार्यांनी सांगितले. प्रशिक्षण संस्थेत 1200 कर्मचारी प्रशिक्षणाला विविध विभाग, झोनमधून आले आहे. तेथे एकाच वेळी एका हॉलमध्ये 250 कर्मचारी जेवणाला बसतात. रेल्वे कर्मचार्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी रेल्वे हॉस्पीटल येथे जात कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
रुग्णालयात गर्दी : माहिती देण्यास प्रशासन असमर्थ
विषबाधेमुळे मोठ्या संख्येने कर्मचारी रेल्वे रुग्णालयात दाखल झाल्याने तेथे प्रचंड गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आरपीएफचा बंदोबस्त लावण्यात आला मात्र माध्यमांना माहिती देण्यास मनाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारीही माहिती देण्यास असमर्थ असल्याने संताप व्यक्त झाला. रेल्वे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रेल्वे कर्मचार्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असतांना सुध्दा रेल्वेचे अधिकारी हे 40 जण दाखल असल्याचे सांगत असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला.
250 रुपये देऊनही विषारी अन्न? नापास करण्याची धमकी
प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचार्यांना दररोज 250 रुपये शुल्क भरूनही सकस व सुरक्षित अन्न मिळत नाही, ही बाब रेल्वे प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक आहे. केवळ जेवणच नव्हे, तर येथील वसतिगृहांचीही अवस्था दयनीय झाली आहे. तक्रार केल्यास परीक्षेत नापास करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली जाते, असा गंभीर आरोप कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. रेल्वेच्या प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचार्यांनी तेथील जेवणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
विषबाधा प्रकरणाची व्हावी सखोल चौकशी
झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये झालेल्या विषबाधा प्रकाराची सखोल चौकशी केली जाणार आहे. यासाठी रात्री कर्मचार्यांनी केलेल्या जेवणाचे नमुने घेतले असल्याने या प्रकाराची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. कर्मचार्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जाणार आहे. ज्या कर्मचार्यांना बरे वाटले त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. डीआरएम पुनीत अग्रवाल यांनी भेट रूग्ण कर्मचार्यांची विचारपूस केली.
वरिष्ठ अधिकारी करतात काय ?
रेल्वे झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोयी असल्याच्या तक्रारी आहेत, हॉस्टेल सुध्दा खराब झाले असून त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सेंटरला अचानक भेट देऊन पहाणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे. येथे सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर व भुसावळ विभागातील कर्मचारी हे प्रशिक्षणास येतात. भारतीय रेल्वेच्या विविध झोनमधील कर्मचारी सुध्दा येथे प्रशिक्षणाला येत असतात. झोनल ट्रेनिंग सेंटरची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
अन्नाचे नमुने तपासणीसाठी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत असून संबंधित कर्मचार्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. विषबाधेची माहिती घेतली असून सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल, कर्मचार्यांशी संवाद साधत त्याच्या समस्या समजून घेतल्या जातील. काही कर्मचारी हे खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असल्याचे झोनल ट्रेनिंग संस्थेचे प्राचार्य डॉ.राम निवास मीना यांनी सांगितले.
