वरणगावच्या विकासासाठी कुणाचे पाय पकडण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही : नूतन नगराध्यक्ष सुनील काळे
Even if it comes to the point of having to beg anyone for the development of Varangaon, I will not back down : New Municipal President Sunil Kale भुसावळ (31 डिसेंबर 2025) : वरणगाव शहरातील नागरिकांनी स्वच्छ, पारदर्शक आणि आदर्श निवडणूक पार पाडत विकास कामांना कौल दिला. माझ्यावर अन्याय झाला असला, तरी त्याची जखम वरणगावकरांच्या मनावर झाली. नागरिकांनी कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मला नगराध्यक्षपदी निवडून दिले. नागरिकांनी केवळ मतदानच केले नाही तर निवडणुकीसाठी स्वतःच्या खिशातून मदतही केली. या विश्वासाच्या जोरावर मी विजय मिळवला असून वरणगावच्या विकासासाठी कुणाचेही पाय पकडण्याची वेळ आलीतरी मागे हटणार नाही, असे ठाम प्रतिपादन नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार
सोमवारी सायंकाळी हजारो वरणगावकरांच्या उपस्थितीत सुनील काळे यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी जुन्या नगरपालिकेपासून ग्रामदैवत रेणुका देवी माता मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नगरपालिकेत पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आई-वडिलांसह ज्येष्ठ नागरिकांना सोबत बसवत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मंत्री गिरीश महाजनांचे आशीर्वाद
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, गिरीश महाजन यांचे आशीर्वाद मला लाभले आहेत मात्र रक्षा खडसे व संजय सावकारे यांचे नाव न घेता यांच्याकडून अद्याप शुभेच्छांचा फोन आलेला नाही. असे असले तरी वरणगावच्या विकासासाठी मी कोणाकडेही कमीपणा घेणार नाही आणि गरज पडल्यास कुणाचेही पाय पकडेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
आधी भुसावळची स्थिती पाहावी : राजेंद्र चौधरी
यावेळी राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी सांगितले की, सुनील काळे हे भाजपचेच कार्यकर्ते असून त्यांनी भाजप सोडलेले नाही किंवा पक्षाने त्यांना काढलेले नाही त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. नागरिकांनी पाणीदार नगराध्यक्ष निवडून दिला असून 24 तास पाणी देण्याची भाषा करणार्यांनी आधी भुसावळची स्थिती पहावी, अशी टीकाही त्यांनी केली. जनतेचा कौल मान्य करून सर्वांनी सुनील काळे यांना सोबत घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विकास अडवणार्यांची भाषा करणार्यांना उघडे पाडा
अध्यक्षीय भाषणात प्रा.जतीन मेढे म्हणाले की सांगितले की, जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात वरणगाव शहराची निवडणूक गाजली. अपक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सुनील रमेश काळे यांची नोंद झाली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. सर्व समाजघटकांनी त्यांना मतदान केल्याने हा इतिहास घडू शकला मात्र यावेळी सर्व नगरसेवकांनी त्यांना मदत करणे अपेक्षित होते. विकास अडवण्याची भाषा करणार्यांना उघडे पाडा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सर्वच नगरसेवकांनी फिरवली पाठ
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या पदग्रहण सोहळ्याकडे भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या 21 नगरसेवकांनी पाठ फिरवली त्यामुळे येणार्या काळात वरणगावच्या विकास कामांसाठी सुनील काळे यांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
पदग्रहण सोहळ्याला नागरिक होते उपस्थित
लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सोमवारी सायंकाळी पदग्रहण केले. सुरुवातीला शहरातील मान्यवरांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून त्यांना मान दिला यानंतर झालेल्या सभेत शहरातील महिला व पुरुष यांनी उपस्थिती देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव केला. वरणगाव शहरात पहिल्यांदाच राजकीय कार्यक्रमातून एखाद्या पदासाठी नागरिकांच्या साक्षीने पदग्रहण केल्याचा इतिहास सुनील काळे यांनी घडविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी तर आभार मिलिंद शिंदे यांनी मानले.
