भुसावळातील विषबाधा प्रकरण ; एनआरएमयूतर्फे निदर्शने : चौकशीची मागणी

दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा


Food poisoning incident in Bhusawal; protests by NRMU: demand for an inquiry भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरातील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये 29 डिसेंबर रोजी रात्री जेवणानंतर तब्बल 142 हून अधिक प्रशिक्षणार्थींना अचानक त्रास होऊन विषबाधेची लक्षणे दिसून आली. गंभीर प्रकृती बिघडल्याने अनेक प्रशिक्षणार्थींना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गंभीर घटनेबाबत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

हा प्रकार तर जीवाशी खेळण्याचा
एनआरएमयूतर्फ झेडआरटीआय प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सांगितले की, प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणार्‍या जेवणाच्या दर्जाबाबत युनियनकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडला असून, हे प्रशिक्षणार्थींच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

युनियनने पुढे नमूद केले की, झेडआरटीआयमधील ट्रेनिंग अ‍ॅडव्हायझरी कमिटीच्या बैठका नियमित व प्रभावीपणे घेतल्या जात नाहीत त्यामुळे प्रशिक्षणार्थींच्या मूलभूत समस्या वेळेत मार्गी लागत नसून, याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून ही गंभीर घटना घडली आहे.
या पार्श्वभूमीवर एनआरएमयूने स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी, निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवणार्‍या संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकार्‍यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच भविष्यात अन्नाच्या दर्जा, स्वच्छता व सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत झेडआरटीआयमध्ये सतत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युनियनने दिला आहे. आंदोलनामुळे प्रशिक्षण कार्यात अडथळे निर्माण झाल्यास किंवा संस्था बंद ठेवण्याची वेळ आल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असेही स्पष्ट करण्यात आल्याने एनआरएमयूचे विभागीय अध्यक्ष इब्राहीम खान कळवतात.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !