देशातील सर्वात स्वच्छ शहरात दूषित पाण्यामुळे 12 नागरिकांचा मृत्यू
पत्रकाराच्या प्रश्नावर मंत्री विजयवर्गीय यांनी उच्चारले अपशब्द : काँग्रेसची राजीनाम्याची मागणी
Twelve citizens died due to contaminated water in the country’s cleanest city इंदौर (1 जानेवारी 2026) : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गणना होणार्या इंदौरमध्ये दूषित पाण्याने 12 लोकांचा मृत्यू झाल्याने जनसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंदूरमधील भागीरथपुरा येथे दूषित पाण्यामुळे झालेल्या घटनेनंतर 11 जणांच्या नावांची त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्टी केली असून 162 नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवार, 31 रोजी संध्याकाळी डॉ. मोहन यादव इंदूरला पोहोचल्यानंतर त्यांनी रुग्णांची भेट घेतली. यावेळी पत्रकाराच्या प्रश्नावर मंत्री संतापले व त्यांनी अपशब्दाचा प्रयोग केल्यानंतर काँग्रेसने मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
बड्या अधिकार्यांवर होणार कारवाई
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, अशी दुःखद परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ नये, यासाठी तुम्ही सर्वांनी व्यापक व्यवस्थापनात लक्ष घालावे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या मोठ्या अधिकार्यांवर कारवाई करण्याबाबत ते म्हणाले की, अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. बैठकीत सहभागी होऊन मंत्री कैलाश विजयवर्गीय बाहेर आले तेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारले. एका वार्ताहराने सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी खर्च झालेल्या पैशांचा परतावा अद्याप मिळालेला नाही. यावर मंत्री विजयवर्गीय म्हणाले- अरे सोडा यार, तुम्ही फुकटचे प्रश्न विचारू नका. यावर रिपोर्टर म्हणाला- हा फुकटचा प्रश्न नाही. आम्ही तिथे जाऊन आलो आहोत. याला उत्तर देताना मंत्री विजयवर्गीय यांनी संतापून अपशब्द उच्चारले. मात्र, काही वेळानंतर त्यांनी द वर ट्वीट करून आपल्या शब्दांबद्दल खेद व्यक्त केला.

काँग्रेसने विजयवर्गीय यांचा राजीनामा मागितला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत हे काय नाटक करत आहे आपले सरकार आणि आपले मंत्री ! ना पीडितांना मोफत उपचार मिळत आहेत, ना सहानुभूती, वरून आपले अहंकारी मंत्री अपशब्दांचा वापर करत आहेत. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर अशा उद्धट मंत्र्यांकडून नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा घ्या.
उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून मागितला स्टेटस रिपोर्ट
भागीरथपुरा येथे दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी एक इंदूर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष रितेश इंसानी यांनी तर दुसरी भागीरथपुरा येथील रहिवासी राहुल गायकवाड यांनी दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने दोन्ही याचिकांवर बुधवारी संयुक्त सुनावणी केली. यात दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिनव धनोत्कर आणि ऋषी कुमार चौकसे यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयासमोर सांगितले की, परिसरात परिस्थिती खूप बिघडत आहे. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, हे तर करावेच लागेल. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल 2 जानेवारी रोजी सादर करा की, किती रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि किती मृत्यू झाले आहेत.

