भुसावळात अवतरले ‘वृंदावन’ ; 300 किलो फुलांच्या पाकळ्यांनी श्री राधा-मुरलीधरांना ‘पुष्प अभिषेक’
‘Vrindavan’ incarnated in Bhusawal ; ‘Pushpa Abhishek’ to Shri Radha-Muralidhar with 300 kg flower petals भुसावळ (6 जानेवारी 2026) : शहरातील इस्कॉन मंदिरात रविवारी भक्ती आणि सौंदर्याचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. निमित्त होते, श्री श्री राधा-मुरलीधर भगवंतांच्या ‘पुष्प अभिषेक’ महोत्सवाचे. सुमारे 300 किलो वजनाच्या आणि 30 विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांनी भगवान राधा कृष्णाच्या मुर्तीला न्हाऊ घालण्यात आले. या सोहळ्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर फुलांच्या सुगंधाने आणि ’हरे कृष्ण’ महामंत्राच्या जयघोषाने दरवळून गेला होता, ज्यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष वृंदावनात असल्याचा भास होत होता.
30 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांच्या पाकळ्यांचा वापर
पौष महिना हा निसर्गाच्या बहराचा काळ मानला जातो. यादिवसांत निसर्ग विविधरंगी फुलांनी सजलेला असतो. वृंदावनात गोपी ज्याप्रमाणे कृष्णाचा फुलांनी शृंगार करून अभिषेक करत असत, तीच संकल्पना समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही 4 जानेवारी रोजी हा महोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी गुलाब, झेंडू, मोगरा, शेवंती यासह 30 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला होता.


मधुर कीर्तन व चैतन्यमयी वातावरण
फसकाळपासूनच मंदिरात उत्सवाचे वातावरण होते. संपूर्ण गाभारा आणि मंदिर परिसर फुलांच्या माळांनी अतिशय मनमोहक पद्धतीने सजवण्यात आला होता. सायंकाळी जेव्हा प्रत्यक्ष अभिषेकाला सुरुवात झाली,तेव्हा उपस्थित 700 हून अधिक भाविकांनी टाळ-मृदंगाच्या तालावर आणि मधुर कीर्तनावर ठेका धरला. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असताना भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
महाप्रसादाने सांगता
हा उत्सव केवळ दर्शनापुरता मर्यादित न राहता, भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेल्या भाविकांसाठी ’महाप्रसादाचे’ देखील आयोजन करण्यात आले होते. सुमारे 700 भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉन मंदिराच्या स्वयंसेवकांनी व भक्तांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती.
वृंदावन भावाचा अनुभव
दरवर्षी तिथीनुसार आम्ही हा पुष्प अभिषेक सोहळा आयोजित करतो. भगवंतांप्रती भक्ती व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे.जेव्हा 300 किलो फुलांचा वर्षाव श्री राधा-मुरलीधरांवर होतो, तेव्हा तो सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो, असे डॉ. रेखा पाटील यांनी सांगितले. रात्री उशीरापर्यत मंदिरात भाविकांची गर्दी होती, रात्री उशीरापर्यत राधे राधे, जय श्रीकृष्णाचा जय घोष केला जात होता.







