पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीत महिलांवर मोठा अन्याय : प्र.ह.दलाल यांचा दावा
Major injustice against women in the ‘Pavitra’ portal teacher recruitment : P.H. Dalal’s claim भुसावळ (6 जानेवारी 2026) : राज्यात सध्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत आहे. शिक्षक नियुक्ती करताना होणारा भ्रष्टाचार आदी होऊ नये व गुणवत्ता असणार्या लायक उमेदवार जात, पैसे आदी कारणांनी डावलले जाऊ नये ह्या उदात्त हेतूने सुरू केलेली ही योजना निश्चितच चांगली आहे पण ही योजना स्त्रियांवर मात्र अन्याय करणारी ठरू पाहत असल्याचा दावा भुसावळातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे.
हा तर सरळ-सरळ अन्यायच
दलाल यांच्या माहितीनुसार, या योजनेनुसार राज्यात कोठेही नोकरीसाठी प्रस्तावित केले जाते.पुरुष शिक्षकांना हे ठिक आहे मात्र स्त्रियांच्या बाबतीत कठीण आहे. अविवाहित मुलगी स्वतःचे गाव, जिल्हा सोडून 300/400 किमी अंतरावरील जिल्ह्यात जाणे अनेकार्थाने कठीण आहे. तिला भाऊ नसेल आई-वडील वृद्ध, आजारी असेल तर त्यांना सोडून लांब अंतरावर ती कशी नोकरी करू शकेल? विवाहित असेल व तिला लहान मूल असेल, तिच्या पतीची नोकरी बदली न होऊ शकणार्या खात्यात असेल तर कौटुंबिक जबाबदार्या सोडून ती लांब कशी राहू शकेल? अश्यावेळी पात्रता, इच्छा व गरज असूनही ती नोकरीपासून वंचितच राही ,म्हणून स्त्रीयांना तरी प्रथम त्यांच्या गावी, ते शक्य नसेल तर त्या तालुक्यात व तेही न जमल्यास त्या जिल्ह्यातच संधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा ही योजना त्यांच्यावर अन्याय करणारीच ठरेल.


शासनाकडूनच विसंगती
विशेष म्हणजे स्व-जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये जागा रिक्त असताना तेथे इतर लांबच्या जिल्ह्यातून व्यक्ती बोलावणे व त्या जिल्ह्यातील व्यक्तींना लांब दुसरी कडे पाठविणे हेच मुळी न्याय संगत नाही. शासन एकीकडे स्त्रियांना लाडकी बहिण संबोधत असते आणि दुसरीकडे तिला स्वावलंबी होण्याला अडथळे निर्माण करते ही सुद्धा विसंगती आहे म्हणून ासनाने ह्या योजनेत सुधारणा करून लाडक्या बहिणीनं वरील अन्याय दूर करावा, अशी मागणी ज्येष्ठ शिक्षक नेते प्र.ह.दलाल यांनी केली आहे.







